जवळपास आठवड्याभरापूर्वी स्वत:च्या घरातूनच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहणाऱ्या किंबहूना त्याआधी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणाऱ्या भारताच्या तेजस्विन शंकरने बुधवारी मध्यरात्री बर्मिंगहॅममध्ये कांस्यक्रांती घडवली. अॅथलेटिक्समधील उंच उडी प्रकारात पदक पटकावणारा भारताचा पहिला खेळाडू ठरण्याचा मान मिळवताना तेजस्विनने कांस्यपदकावर नाव कोरले.
पात्रतेचे निकष मिळवूनही राष्ट्रकुल स्पर्धेसाठी डावलण्यात आल्याने शंकरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने अॅथलेटिक्स महासंघाला दिशा दाखवल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. परंतु काही दिवसांनी आयोजकांनी उशीर झाल्यामुळे तेजस्विनला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असे जाहीर केल्याचे महासंघाने सांगितले. त्यामुळे स्पर्धेचा पहिला दिवस उजाडला तरी तेजस्विनच्या समावेशाबाबत संभ्रम कायम होता. अखेर भारतीय संघातील दोन खेळाडू डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने तेजस्विनचा मार्ग मोकळा झाला. या सर्व आघाड्यांवर मात करून तेजस्विनने उंच उडीत कमाल करताना त्याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच महासंघाला चोख प्रत्युत्तर दिले. तेजस्विनने २.२२ मीटर अंतरावर झेप मारून तिसरा क्रमांक मिळवला. बहामासचा डोनाल्ड थॉमस आणि इंग्लंडचा जोएल क्लार्क यांनीही तेजस्विन इतक्याच अंतरावर झेप मारली. परंतु तेजस्विनने पहिल्याच प्रयत्नात (एकंदर चौथा) हे अंतर सर केले होते. त्यामुळे त्याच्या गळ्यात कांस्यपदक पडले. यापूर्वी १९७०च्या राष्ट्रकुलमध्ये भारताच्या भीम सिंग यांनी २.६ मीटर अंतरावर झेप घेतली होती. परंतु दिल्लीच्या २३ वर्षीय तेजस्विनने त्यांचा विक्रमही मोडीत काढला.
दरम्यान, न्यूझीलंडच्या हॅमिसन कीरने (२.२८ मी.) सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रँडन स्टार्कने (२.२५ मी.) रौप्यपदक जिंकले.