मेलबर्न : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे १२ दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाला जबर तिहेरी धक्के बसले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स आणि अनुभवी जोश हेझलवूड या वेगवान गोलंदाजांची जोडी दुखापतीमुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. तसेच अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार असून ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांसह ब-गटात समावेश करण्यात आला आहे. तूर्तास ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून १२ फेब्रुवारीपासून उभय संघांत २ एकदिवसीय सामनेसुद्धा होणार आहेत. ऑस्ट्रेलियाने १३ जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला होता. त्यामध्ये हेझलवूड, कमिन्स व स्टॉयनिस या तिघांचाही समावेश होता. मात्र गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी अधिकृतपणे हे तिन्ही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनुपलब्ध असल्याचे जाहीर केले. मिचेल मार्शही दुखापतीमुळे आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे आता १२ फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाहीर केलेल्या १५ खेळाडूंपैकी ४ खेळाडू बदलावे लागणार आहेत.
कमिन्स पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. तसेच हेझलवूडला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्नायूंच्या दुखापतींने हैराण केले. त्यामुळे तो आणखी महिनाभर तरी क्रिकेटकडे वळणार नाही. कमिन्सच्या अनुपस्थितीत ट्रेव्हिस हेड किंवा स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे. प्रशिक्षक अँड्रू मॅक्डोनाल्ड याविषयी काही दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित आहे.
३५ वर्षीय स्टॉयनिसच्या निवृत्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. टी-२० प्रकारावर अधिक लक्ष देण्याच्या हेतून स्टॉयनिसने निवृत्ती जाहीर केली. स्टॉयनिसने ७१ एकदिवसीय सामन्यांत १,४९५ धावा केल्या, तसेच मध्यमगती गोलंदाजीसह ४८ बळी मिळवले. २०२३च्या विश्वचषक विजेत्या संघाचा स्टॉयनिस भाग होता. कॅमेरून ग्रीन जायबंदी असल्याने स्टॉयनिसला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी लाभली होती. मात्र आता त्याच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे.