PM
क्रीडा

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका शफिक, शान यांची अर्धशतके; मात्र पाकिस्तान अडचणीतच!

कर्णधार पॅट कमिन्सने तीन, फिरकीपटू नॅथन लायनने दोन, तर जोश हेझलवूडने एक बळी मिळवला आहे.

Swapnil S

मेलबर्न : सलामीवीर अब्दुल्ला शफिक (१०९ चेंडूंत ६२ धावा) आणि कर्णधार शान मसूद (७६ चेंडूंत ५४) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांनंतरही पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अडचणीत सापडला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) सुरू असलेल्या उभय संघांतील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची ६ बाद १९४ अशी स्थिती असून ते पहिल्या डावात अद्याप १२४ धावांनी पिछाडीवर आहेत.

कर्णधार पॅट कमिन्सने तीन, फिरकीपटू नॅथन लायनने दोन, तर जोश हेझलवूडने एक बळी मिळवला आहे. दुसऱ्या दिवसअखेर मोहम्मद रिझवान २९, तर आमीर जमाल २ धावांवर खेळत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पाकिस्तान आधीच ०-१ अशा पिछाडीवर असल्याने त्यांना गुरुवारी झुंजार खेळ करून ऑस्ट्रेलियाला आघाडी घेण्यापासून रोखावे लागेल.

तत्पूर्वी, मंगळवारच्या ३ बाद १८७ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ९६.५ षटकांत ३१८ धावांत संपुष्टात आला. मार्नस लबूशेनने ५ चौकारांसह ६३ धावा करताना कारकीर्दीतील १७वे अर्धशतक साकारले. मिचेल मार्शने ४१ धावांचे योगदान दिले. मात्र ट्रेव्हिस हेड (१७), अॅलेक्स कॅरी (४), मिचेल स्टार्क (९) छाप पाडू शकले नाहीत. पाकिस्तानसाठी आमीर जमालने तीन, तर हसन अली, मिर हामजा, शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

त्यानंतर पाकिस्तानने इमाम उल हकला (१०) लवकर गमावले. मात्र शफिक व मसूद यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. शफिकने पाचवे, तर मसूदने आठवे अर्धशतक झळकावले. कमिन्सने स्वत:च्याच गोलंदाजीवर शफिकचा अप्रतिम झेल घेत ही जोडी फोडली. मग बाबर आझमचा (१) त्याने त्रिफळा उडवला. लायनने मसूदला जाळ्यात अडकवले. तर हेझलवूडने सौद शकीलचा (९) अडसर दूर केला. ६ बाद १७० वरून रिझवान व जमाल यांनी सातव्या विकेटसाठी २४ धावांची भर घातली आहे.

संक्षिप्त धा‌वफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९६.५ षटकांत सर्व बाद ३१८ (मार्नस लबूशेन ६३, उस्मान ख्वाजा ४२; आमीर जमाल ३/६४)

पाकिस्तान (पहिला डाव) : ५६ षटकांत ६ बाद १९४ (अब्दुल्ला शफिक ६२, शान मसूद ५४; पॅट कमिन्स ३/३७)

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली