नवी दिल्ली : भारताचा २१ वर्षीय उगवता तारा आयुष शेट्टीने सोमवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. चीनचा विद्यमान जगज्जेता तसेच अग्रमानांकित शी यूकी याच्यावर आयुषने धक्कादायक विजय मिळवून राऊंड ऑफ ३२ फेरीत प्रवेश केला. यासह भारताच्या अन्य स्पर्धकांनीदेखील आपापले सामने जिंकून दुसरी फेरी गाठली. त्यामुळे स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी पंचतारांकित विजयाचा ठरला.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सोमवारपासून जागतिक स्पर्धेच्या ३०व्या पर्वाला प्रारंभ झाला. भारताला २००९ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तसेच जानेवारी महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान निर्माण झालेल्या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटना (बीएआय) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांनी स्टेडियमच्या रचनेत व सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे एकूणच या स्पर्धेद्वारे भारतीय खेळाडूंची तसेच आयोजकांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सोमवारी पुरुष एकेरीत कोर्ट क्रमांक १ वर होणाऱ्या आयुष विरुद्ध यूकी यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. ३० वर्षीय यूकी हा २०२५च्या जागतिक स्पर्धेचा विजेता तर होताच. शिवाय २०२२च्या राष्ट्रकुलमध्येही त्याने सुवर्ण पटकावले होते. जागतिक क्रमवारीत तो सध्या अग्रस्थानी विराजमान आहे. मात्र भारताच्या बिगरमानांकित आयुषने अविश्वसनीय खेळ करताना यूकीला २१-१४, १३-२१, २१-१९ असे पराभूत केले. १ तास आणि १३ मिनिटांच्या संघर्षानंतर आयुषने बाजी मारली.
कर्नाटकच्या आयुषने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करत ११-५ अशी आघाडी घेत अखेरीस २१-१४ असा गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये यूकीने २१-१३ अशी बाजी मारून पुनरागमन करत सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. तिसऱ्या गेममध्ये आयुषने १५-५ अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र, चिनी खेळाडूने सलग गुण मिळवत आघाडी २०-१९ अशी कमी केली. या दबावाच्या प्रसंगी शांत राहून आयुषने शेवटचा गुण मिळवत कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आयुषचा पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी अद्याप ठरलेला नाही. विजयानंतर आयुषने चाहत्यांचे अभिवादन केले. तसेच त्यांच्यासह सेल्फी काढून तो कोर्टमधून बाहेर पडला. आता मंगळवारी भारताचा अन्य स्पर्धक लक्ष्य सेन त्याच्या अभियानाची सुरुवात करेल.
महिलांमध्ये सिंधूचा शानदार विजयारंभ
महिला एकेरीत भारताची अनुभवी खेळाडू पी. व्ही. सिंधूने विजयारंभ करताना आयर्लंडच्या सोफिया नोबलचा २१-७, २१-११ असा फडशा पाडला. नवव्या मानांकित सिंधूने अवघ्या २९ मिनिटांत ही लढत जिंकली.
३१ वर्षीय सिंधूने यापूर्वी जागतिक स्पर्धेत २०१९ मधील सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकली आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ चीनच्या लिन डॅन आणि झाओ युनलेई यांनीच पाच पदके जिंकली आहेत. त्यामुळे यंदा उपांत्य फेरीत प्रवेश करून कांस्यपदक निश्चित करताच सिंधू सहा पदके जिंकणारी जगातील पहिली खेळाडू ठरेल.
पहिल्या गेममध्ये ११-२ अशी भक्कम आघाडी घेत सिंधूने सहज विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्ये नोबलने थोडा प्रतिकार केला, परंतु सिंधूने अनुभवाच्या जोरावर २१-११ अशी मात केली. आता राऊंड ऑफ ३२ फेरीत सिंधूचा सामना कॅनडाच्या वेन यु झँगशी होईल.
दुहेरीत भारताची हॅटट्रिक; ट्रीसा-गायत्री, अर्जुन-हरिहरनची आगेकूच
महिला दुहेरीत दोन, तर पुरुष दुहेरीत एक असे दुहेरीच्या प्रकारांत भारताने एकूण तीन विजय मिळवले. महिला दुहेरीत सर्वप्रथम ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने स्पेनच्या पॉला लोपेझ आणि लुसिया रॉड्रिग्ज यांचा २१-९, २१-१३ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत हरीहरन अमसाकरुणन आणि एम. आर. अर्जुन यांच्याविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतल्याने भारतीय जोडीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. कविताप्रिया सेल्वाम आणि सिमरन सिंगी यांनी स्पेनच्या निकोल कॅरुला आणि कार्मेन मारिया जिमेनेझ यांचा २२-२०, २१-१४ असा पराभव केला. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पाचव्या मानांकित जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.
चाहत्यांचा उदंड प्रतिसाद
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विशेषत: भारताचे चार सामने लागोपाठ असल्याने चाहत्यांचा आवाज वाढला. यंदा स्टेडियममधील हवेशीर मार्ग सील करण्यात आले असून लाकडी दरवाजांच्या जागी दुहेरी स्वयंचलित प्रवेशप्रणाली बसवण्यात आली आहे. पक्षी आणि किड्यांना दूर ठेवण्यासाठी अमेरिकेतून मागवलेल्या बिनविषारी जेलचा वापर करण्यात आला आहे, तसेच हिंस्त्र पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत. याशिवाय माकडांचा वावर रोखण्यासाठी मंकी व्हिस्परर्सची मदत घेण्यात येत असून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे.