Photo : X (@BCBtigers)
क्रीडा

बांगलादेशचा पाकिस्तानला पुन्हा धक्का, रोमहर्षक दुसऱ्या सामन्यात ८ धावांनी सरशी, पाकविरुद्ध प्रथमच जिंकली T20 मालिका

BAN vs PAK : लिटन दासच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बांगलादेशने मंगळवारी पराक्रम केला. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची किमया साधली. डावखुरा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लामने (१७ धावांत ३ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानवर ८ धावांनी सरशी साधली.

Swapnil S

मिरपूर : लिटन दासच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बांगलादेशने मंगळवारी पराक्रम केला. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध प्रथमच टी-२० मालिका जिंकण्याची किमया साधली. डावखुरा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लामने (१७ धावांत ३ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानवर ८ धावांनी सरशी साधली.

बांगलादेशने दिलेल्या १३४ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १९.२ षटकांत १२५ धावांत गारद झाला. त्यामुळे बांगलादेशने ३ लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. गोलंदाजांनी या लढतीत वर्चस्व गाजवले असले, तरी आव्हानात्मक खेळपट्टीवर ४८ चेंडूंत ५५ धावांची झुंजार खेळी साकारल्याने बांगलादेशचा फलंदाज जेकर अलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला ११० धावांत गारद केल्यावर ७ गडी राखून विजय मिळवला होता. आता गुरुवारी तिसरी टी-२० लढत खेळवण्यात येईल.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ २० षटकांत १३३ धावांत गारद झाला. लिटन (८), तौहिद हृदय (०), मोहम्मद नईम (३) यांनी निराशा केली. मात्र जेकरने ५ षटकारांसह झुंजार अर्धशतक साकारले. त्याला मेहदी हसनने ३३ धावांची साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भर घातली. पाकिस्तानकडून सलमान मिर्झा व अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना फिरकीपटू मेहदी हसन व इस्लामपुढे पाकिस्तानची घसरगुंडी उडाली. पॉवरप्लेमध्येच त्यांची ५ बाद १५ अशी अवस्था होती. इस्लामने फखर झमान (८), मोहम्मद हारिस (०) यांचे बळी मिळवले. कर्णधार सलमान अघाही (९) छाप पाडू शकला नाही. ७ बाद ४७ अशा स्थितीतून मग फहीम अश्रफने ३२ चेंडूंत ५१ धावांची घणाघाती खेळी साकारली.

त्याने ४ चौकार-षटकारांची आतषबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली. मात्र १९व्या षटकात रिशाद होसेनने अश्रफला बाद केले व २०व्या षटकात अहमदला बाद करून मुस्तफिझूर रहमानने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, या दोन्ही सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांवर पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी टीका केली आहे. २०२६मध्ये रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तयारी करताना आम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळावे लागणे, हे दुर्दैव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

न्या. वर्मा यांच्या याचिकेवरील सुनावणीतून सरन्यायाधीशांची माघार; विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार

2006 Mumbai Local Train Blasts : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सुटलेल्या आरोपींचं काय होणार?

चाकरमान्यांना बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी ST ची ३०% भाडेवाढ अखेर रद्द

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आयोगाकडून सुरू

सूरज चव्हाण अखेर शरण; जामिनावर सुटका