क्रीडा

कुस्तीपटूंच्या भूमिकेवर बृजभूषण म्हणाले...

कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांविषयी पोलिसांनी आपली चौकशी केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

नवशक्ती Web Desk

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शांततेत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांकडून चिरडण्यात आलं. त्यानंतर कुस्तीपटूंनी आक्रमक भूमिका घेत आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याची भूमिका घेतली. यासाठी कुस्तीपटू हे हरिद्वार येथील गंगा घाटावर पोहचले देखील. मात्र, भारतीय किसान संघटनेनं समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी अखेरच्या क्षणी आपला निर्णय मागे घेतला. तसेच सरकार बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदत दिली. याप्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांविषयी पोलिसांनी आपली चौकशी केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बृजभूषण बोलत होते.

या विषयी बोलताना ते म्हणाले की, "पदके पाण्यात विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय हा कुस्तीपटूंचा वयक्तीक निर्णय होता. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आरोपांमध्ये तथ्य असल्यास मला अटक केली जाईल. कुस्तीपटू पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला गेले. पण नंतर त्यांनी ती नरेश टिकैत यांच्याकडे सोपवली. ही त्यांची भूमिका आहे. आम्ही काय करु?" अशी प्रतिक्रिया बृजभूषण यांनी दिली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून भारताचे आघाडीचे कुस्तीपटू हे दिल्लीतील जंतरमंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोर कुस्तीपटूंनी केले आहेत. रविवारी या कुस्तीपटूंची धरपकड करत त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांची चौकशी करुन त्यांना सोडण्यात आलं. त्यातील आघाडीच्या कुस्तीपटूंवर गु्न्हे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या कुस्तीपटूंनी आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला होता. कुस्तीपटूंनी घेतलेल्या निर्णयानुसार कुस्तीपटू मंगळवारी संध्याकाली हरिद्वार येथील गंगा घाटावर पोहचले. यावेळी त्याठिकाणी कुस्तीपटूंच्या शेकडो समर्थकांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी कुस्तीपटू गंगा घाटावर हातात पदकं घेऊन बसले असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. यावेळी तेथील संपुर्ण वातावरण हे भावूक झाले होते. या प्रकरणात ऐनवेळी भारतीय किसान संघटनेने मध्यस्ती करत संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी पैलवानांना पदकं विसर्जित करण्यापासून रोखलं तसंच ती पदकं स्व:ताकडे घेतली. यानंतर कुस्तीपटूंकडून सरकारला बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देत असल्याचं कुस्तीपटूंकडून जाहीर करण्यात आलं.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश