भारताचा तरुण बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवत थरारक कामगिरी केली आहे. सातव्या फेरीत त्याने भारताच्याच अर्जुन एरिगाईसीचा पराभव करत स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले.
याआधी सहाव्या फेरीत गुकेशने पाच वेळा जागतिक विजेतेपद पटकावलेला आणि सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनला हरवून खळबळ उडवून दिली होती. या सलग दोन विजयांमुळे गुकेशचे ११.५ गुण झाले असून त्याने गतविजेता कार्लसनला मागे टाकले आहे.
सध्या अमेरिकेचा फॅबियानो कारुआना १२.५ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याने चीनच्या वेई यीचा पराभव करत आपले स्थान बळकट केले. दरम्यान, कार्लसनने अमेरिकन ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुराला आर्मागेडन टायब्रेकमध्ये पराभूत करत ११ गुण मिळवले आणि तिसरे स्थान मिळवले. नाकामुरा ८.५ गुणांसह चौथ्या, तर पराभूत झालेला एरिगाईसी ७.५ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. चीनचा वेई यी ६.५ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
स्पर्धेतील अजून तीन फेऱ्यांचे सामने बाकी असून अंतिम विजेता कोण ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गुकेशकडून पराभव पत्करल्यानंतर कार्लसन रागाच्या भरात पटावर ठोसा मारताना दिसला होता. ज्यामुळे बुद्धीबळ पट विकस्टला गेला. मात्र नंतर त्याने गुकेशची माफी मागितली आणि त्याच्या पाठीवर थाप देत खेळगुण दाखवले. मात्र प्रसारमाध्यमांशी संवाद न साधता तो शांतपणे स्पर्धास्थळ सोडून गेला.
गुकेशने कार्लसनला पराभूत केल्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेशला शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हंटले ''नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये सहाव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध मिळवलेला विजय हा डी. गुकेशच्या असामान्य प्रतिभेचे आणि अविरत समर्पणाचे प्रतीक आहे. ही त्याची कार्लसनविरुद्धची पहिलीच विजयश्री असून, त्याने सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्यावर मात करत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. या यशाबद्दल गुकेशचे हार्दिक अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तो आणखी उच्च शिखरे सर करो हीच अपेक्षा.''