PTI
क्रीडा

Neeraj Chopra: एकाच फेकीत, फायनलमध्ये ऐटीत! नीरज चोप्रा भालाफेकीमध्ये पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत

Swapnil S

पॅरिस : भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने सोमवारी संपूर्ण विश्वाला पुन्हा एकदा आपल्या अलौकिक प्रतिभेची जाणीव करून दिली. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरजने भालाफेकीच्या प्राथमिक फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर अंतर सर करून गतविजेत्याच्या थाटात अंतिम फेरीत धडक मारली. आता गुरुवारी नीरज पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी नोंदवून देशासाठी सलग दुसरे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार का, याकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे. गुरुवारी रात्री ११.३० वाजता अंतिम फेरीला प्रारंभ होईल.

२६ वर्षीय नीरजला यंदाच्या ऑलिम्पिकला प्रारंभ होण्यापासूनच सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. चार वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर जागतिक, आशियाई स्पर्धेतही नीरजने सुवर्ण काबिज केले. डायमंड लीगचे विजेतेपद मिळवून नीरजने संपूर्ण विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्णपदकाची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता नीरजवरच तमाम चाहत्यांच्या आशा टिकून आहेत. स्नायूंच्या दुखापतीतून सावरताना नीरजने ब-गटातून अग्रस्थान काबिज करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

नीरजने पहिल्या प्रयत्नात ८९.३४ मीटर अंतरावर भालाफेक केली. अंतिम फेरी गाठण्यासाठी ८४ मीटर अंतरावर भालाफेक करणे गरजेचे होते. नीरजने एकाच भालाफेकीत हे अंतर सर केल्याने त्याला पुढील दोन प्रयत्नांची गरजही भासली नाही. दोन्ही गटांत मिळून ८४ मीटर अंतर सर करणारे १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यात आता गुरुवारी पदकांसाठी संघर्ष रंगणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्येसुद्धा नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर अंतरावर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली होती.

नीरजचा समावेश असलेल्या ब-गटात ग्रेनडाच्या पीटर्स अँडरसनने ८८.६३ मीटर अंतरासह दुसरे स्थान मिळवले. पाकिस्तानचा अर्शद नदीम ८६.५९ मीटरच्या भालाफेकीसह तिसऱ्या स्थानी राहिल्याने तोसुद्धा अंतिम फेरीत दाखल झाला. जर्मनीच्या १९ वर्षीय मॅक्स डेनिंगला मात्र १२व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे तो आगेकूच करू शकला नाही.

> पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.३४ मीटर अंतर सर करून नीरजने या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यापूर्वी डायमंड लीग २०२२मध्ये नीरजने ८९.९४ मीटरवर भालाफेक केली होती. नीरज अंतिम फेरीत ९० मीटरचे अंतर गाठणार का, हे पहावे लागेल.

पहिल्या भालाफेकीवर मी नेहमी विशेष लक्ष देतो. यातच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न देतो. कधी अपयश आलेच, तर पुढील दोन प्रयत्नांमध्ये मी आणखी जोर लावतो. अंतिम फेरीतही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. पुरेशी विश्रांती घेऊन गुरुवारी देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन.
- नीरज चोप्रा

किशोरकडून निराशा ; पात्रता फेरीतच गारद

भालाफेकीच्या अ-गटात भारताच्या किशोर जेनाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. किशोरला तिन्ही प्रकारांत एकदाही ८४ मीटरहून अधिक भालाफेक करता आली नाही. त्याची सर्वोत्तम भालाफेक ८०.७३ इतकी ठरली. दोन्ही गटांतील मिळून ३२ खेळाडूंत किशोर १८व्या स्थानी राहिला. जर्मनीच्या वेबर जुलियनने ८७.७६ अंतरासह या गटात अग्रस्थान पटकावून आगेकूच केली. चेक प्रजासत्ताकचा जेकब वॅडेलच ८५.९७ मीटरसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला