अहिल्यानगर : यजमान महाराष्ट्रासह गतविजेता भारतीय रेल्वे, हरयाणा, चंदीगड यांनी ‘७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. सेनादल संघ सलग दुसऱ्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत गारद झाले.
अहिल्यानगर वाडिया पार्क संकुलातील मॅटवर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचे आव्हान ४५-२५ असे लीलया परतवले. साखळी सामन्यात चाचपडत खेळणाऱ्या महाराष्ट्राला बाद फेरीच्या सामन्यात लय सापडली ही महाराष्ट्रातील कबड्डीप्रेमी करीता आनंदाचे बाब म्हणावी लागेल. महाराष्ट्राची उपांत्य फेरीत हरयाणा संघाशी गाठ पडेल. तर भारतीय रेल्वे चंदीगडशी लढत देईल. महाराष्ट्राच्या विजयात कर्णधार अस्लम इनामदारने ४ बोनस व ६ गडी टिपत १० गुण घेतले. सौरभ राऊतने २ बोनस व ५ गडी असे ७ गुण घेत त्याला साथ दिली. शंकर गदईने ४, संकेत सावंत व किरण मगर यांनी प्रत्येकी ३-३ पकडी करीत महाराष्ट्राचा बचाव देखील भक्कम आहे, हे दाखवून दिले.
हरयाणाने सेनादलचा प्रतिकार ३०-२७ असा मोडून काढला. मोहित गोयत, अशु मलिक यांच्या संयमी चढाया, तर अक्षय कुमार, जयदीप यांचा भक्कम बचाव या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. चंदीगडने मध्यांतरातील पिछाडीवरुन उत्तर प्रदेशवर ४९-४३ अशी मात केली.