भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) हा सध्या गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. अशामध्ये त्याच्याबाबतीत भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) एक मोठा किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला की, "भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीमुळे (Virat Kohli) सिराजचे आयुष्य बदलले. म्हणूनच तो कोहलीला मोठ्या भावाप्रमाणे मानतो."
दिनेश कार्तिकने एका कार्यक्रमात त्याच्याबद्दल सांगितले की, "भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असताना अनेक युवा खेळाडूंनी संघात पदार्पण केले. आताही त्यातील काही खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पण काही खेळाडूंसाठी हे फार सोपे नव्हते. त्यातील एक खेळाडू म्हणजे मोहम्मद सिराज. विराट कोहलीने सिराजला पाठिंबा दिल्यामुळे त्याला चांगली संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज सिराजला विराट कोहलीचा जबरदस्त पाठिंबा मिळाला."
दिनेशने सांगितले की, "कोहलीला त्याच्या संघात नेहमीच सिराज हवा होता. निवड अधिकारी मोहम्मद सिराजला वगळणार होते, पण विराटने त्याला पाठिंबा दर्शवला. विराटने त्यावेळी निवड समितीला ठामपणे सांगितले होते की, मला माझ्या संघात मोहम्मद सिराज हवा आहे." सध्या सिराज हा महत्त्वाचा खेळाडू असून त्याने अनेकदा भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे.