PM
क्रीडा

शतकांचा दुहेरी एल्गार

अंधूक सूर्यप्रकाशामुळे आफ्रिकेच्या डावातील फक्त ६६ षटके झालेली असताना खेळ थांबवण्यात आला तेव्हा एल्गरच्या साथीला मार्को यान्सेन ३ धावांवर खेळत होता.

Swapnil S

सेंच्युरियन : सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर बुधवारी शतकांचा दुहेरी एल्गार चाहत्यांना पाहायला मिळाला. सकाळी के. एल. राहुलने (१३७ चेंडूंत १०१ धावा) साकारलेल्या झुंजार शतकाच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात २४५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर कारकीर्दीतील अखेरची मालिका खेळणाऱ्या डीन एल्गरने (२११ चेंडूंत नाबाद १४० धावा) चोख प्रत्युत्तर दिल्याने आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली.

अंधूक सूर्यप्रकाशामुळे आफ्रिकेच्या डावातील फक्त ६६ षटके झालेली असताना खेळ थांबवण्यात आला तेव्हा एल्गरच्या साथीला मार्को यान्सेन ३ धावांवर खेळत होता. आफ्रिकेने पहिल्या डावात ११ धावांची आघाडी मिळवली असून गुरुवारचा दिवस लढतीच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. २३ चौकारांसह १४० धावांवर नाबाद असणाऱ्या एल्गरने कारकीर्दीतील १४वे व भारताविरुद्धचे दुसरे कसोटी शतक झळकावले आहे. भारताकडून जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन, तर प्रसिध कृष्णाने एक बळी मिळवला आहे.

तत्पूर्वी, मंगळवारच्या ८ बाद २०८ धावांवरून पुढे खेळताना राहुल व सिराज यांनी सावध खेळ केला. विशेषत: राहुलने अधिक काळ स्ट्राईक आपल्याकडे राखला. सिराज ५ धावांवर बाद झाल्यावर राहुलने आक्रमण केले. ९५ धावांवर असताना त्याने षटकार लगावून कसोटी कारकीर्दीतील आठवे शतक झळकावले. पुढच्याच षटकात तो नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला व भारताचा पहिला डाव ६७.४ षटकांत २४५ धावांत संपुष्टात आला.

त्यानंतर सिराजने चौथ्याच षटकात एडीन मार्करमचा (५) अडथळा दूर करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. मात्र एल्गर व टॉनी डी झॉर्झी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भर घातली. अखेर जसप्रीत बुमराने झॉर्झी (२८) व कीगन पीटरसन (२) यांना लागोपाठच्या षटकात माघारी पाठवून भारताला पुनरागमन करण्याची संधी दिली. मात्र पदार्पणवीर डेव्हिड बेडिंगहॅमने ७ चौकार व २ षटकारांसह ५६ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने एल्गरसह चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची मोलाची भागीदारी रचून आफ्रिकेला आघाडी मिळवून दिली. सिराजनेच ही जोडी फोडली. तर कृष्णाने कायले वेरानला (४) बाद करून कसोटीतील पहिला बळी मिळवला. एल्गर मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून असल्याने भारताला गुरुवारी त्याच्यासह अन्य फलंदाजांना झटपट गुंडाळावे लागेल.

 २ राहुलने सेंच्युरयन येथे सलग दुसरे शतक झळकावले. २०२१मधील बॉक्सिंग डे कसोटीतही राहुलने १२३ धावा फटकावल्या होत्या. या मैदानात दोन शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी फलंदाज ठरला आहे.

७ राहुलने कसोटी कारकीर्दीत झळकावलेल्या ८ शतकांपैकी ७ शतके ही परदेशात आली आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी