युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं भारतीय कुस्ती महसंघाचं( Wrestling Federation India)सदस्यत्व रद्द केलं आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं भारतीय कुस्ती महासंघाला याआधी देखील निवडणुका घेण्याबाबत ताकीद दिली होती. मात्र, तरीदेखील भारतीय कुस्ती महासंघानं निवडणुका न घेतल्यानं ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पुढील ४५ दिवसांत निवडणुका घेण्यासंदर्भात पत्र लिहलं होतं. निवडणुका झाल्या नाहीत तर तुमचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल, असं या पत्रात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं.
क्रिडा मंत्रालयाकडून कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर महासंघांच्या सहस्यांना निलंबित करण्यात आलं आणि अॅडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे माजी न्यायाधीश एम एम कुमार यांची कुस्ती महासंघांच्या निवडणुकांसाठी निवडणुक अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका या ११ एप्रिल रोजी होणार होत्या. पण तेव्हा आसाम रेसलिंग असोसिएशनने आपल्या मान्यतेसाठी आसाम हायकोर्टात निवडणुकांवर स्थगिती आणली होती. यानंतर अॅडहॉक समितीने आसाम कुस्ती महासंघाला मान्यता दिल्याने ११ जुलैच्या नि़वडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर निवडणुक अधिकारी एम एम कुमार यांनी १२ ऑगस्ट ही तारिख दिली होती. परंतु यावेळेस दिपेंद्र हुड्डा यांच्या समर्थनार्थ हरियाणा कुस्ती महासंघाने निवडणुकांवर स्थगिती आणणारी याचिका हरियाणाच्या हायकोर्टात दाखल केली होती. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुका देखील रद्द करण्यात आल्या होत्या.