न्यूझीलंडला मुळीच कमी लेखू नका; तज्ज्ञांचा भारताला सल्ला Photo : X (ICC)
क्रीडा

न्यूझीलंडला मुळीच कमी लेखू नका; तज्ज्ञांचा भारताला सल्ला

भारताने अंतिम फेरी गाठली असून मायदेशात रंगणाऱ्या अंतिम सामन्यासाठी नक्कीच त्यांचे पारडे जड आहे. मात्र भारताने न्यूझीलंडला कमी लेखू नये, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.

Swapnil S

अहमदाबाद : भारताने अंतिम फेरी गाठली असून मायदेशात रंगणाऱ्या अंतिम सामन्यासाठी नक्कीच त्यांचे पारडे जड आहे. मात्र भारताने न्यूझीलंडला कमी लेखू नये, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.

“न्यूझीलंडचा संघ हा कोणत्याही एखाद दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून नाही. तसेच प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडूविरुद्ध ते हुशारीने अभ्यास करून रणनीती आखतात. द. आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत आपण ते पाहिले. त्यामुळे भारताने आपले सर्वोत्तम ११ खेळाडू निवडून कामगिरीत सातत्य राखावे,” असे गावस्कर यांनी सुचवले.

न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडलाच धूळ चारली होती. मात्र यंदा किवी संघ अधिक जोमाने खेळत असून ऐन क्षणी त्यांनी लय मिळवली आहे. साखळी फेरीत त्यांनी आफ्रिकेकडून, तर सुपर-आठ फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करला होता. मात्र अहमदाबादच्या खेळपट्टीवर ते भारताला कडवी झुंज देऊ शकतात.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या १०व्या पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६ नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता.

मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडची कामगिरी काहीशी संमिश्र स्वरूपाची राहिली आहे. साखळी फेरीत त्यांनी आफ्रिकेकडून पराभव पत्करला. मात्र अन्य तीन संघांना नमवून दुसऱ्या स्थानासह सुपर-आठ फेरी गाठली. मग त्या फेरीत पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्यावर त्यांनी श्रीलंकेला नमवले. मात्र इंग्लंडविरुद्ध फलंदाज तसेच गोलंदाज अपयशी ठरल्याने न्यूझीलंडला १६० धावांचा बचाव करता आला नाही. तरीही सरस धावगती व नशिबाच्या बळावर किवी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे.

२०२१ मध्ये न्यूझीलंडने सर्वप्रथम अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत आफ्रिकेचा सहज धुव्वा उडवून न्यूझीलंडने भारताला अंतिम फेरीपूर्वी इशारा दिला.

बुमरा शेवटी माणूसच, तोसुद्धा चुकू शकतो : फिलिप्स

अहमदाबाद : न्यूझीलंडचा संघ अहमदाबाद येथे गुरुवारीच दाखल झाला होता. त्यांनी शुक्रवारपासून सरावाला प्रारंभ केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने भारतीय संघाला इशारा दिला.

“बुमराच्या गुणवत्तेविषयी शंका नाहीच. तो नक्कीच सध्या सर्वोत्तम गोलंदाज आहे. मात्र अखेरीस तोसुद्धा एक माणूस आहे. रविवारी आमच्याविरुद्ध त्याच्याकडून चूक होऊ शकते. याचाच लाभ आम्ही घेऊ. तसेच निश्चितच त्याला कसे खेळावे, याविषयी आमच्याकडे काही योजना तयार आहेत,” असे फिलिप्स म्हणाला.

ठाणे परिवहन सेवेत दिवाळीपर्यंत २१० नव्या बस दाखल होणार; मे महिन्यात पहिली डबल डेकर बस रस्त्यावर; जूनमध्ये २५ इलेक्ट्रिक बसेसची भर

रिलायन्स कम्युनिकेशन्स बँक फसवणूक प्रकरण : अनिल अंबानी समूहाची ३०३४ कोटींची मालमत्ता जप्त

मिसिंग लिंकवर प्रारंभी वेगमर्यादा निश्चित; हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमीची वेगमर्यादा, महाराष्ट्र दिनी प्रकल्पाचे लोकार्पण

Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; उष्णतेची लाट ओसरली, ‘यलो अलर्ट’ जारी

एकनाथ शिंदेंच्या काळातील योजनांना कात्री; महायुतीत अंतर्गत धुसफूस, ९१.३१ कोटींची वसुली करण्याचे आदेश