संग्रहित छायाचित्र एक्स @ayaantweets69
क्रीडा

मैदानातच तमीम इक्बालला 'हार्ट अटॅक'; तातडीची 'अँजिओप्लास्टी'; BCB ने रद्द केली नियोजित बैठक

ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग दरम्यान घडली घटना. टॉसदरम्यान तो एकदम उत्साही दिसत होता. पहिल्या षटकात त्याने क्षेत्ररक्षण केले, पण नंतर...

Krantee V. Kale

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याला सोमवारी सकाळी सामना सुरू असताना मैदानावरच हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. त्यानंतर तमीमला तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे, असे वृत्त 'इएसपीएन क्रिकइन्फो'ने दिले आहे. सध्या त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.

पहिल्या षटकात त्याने क्षेत्ररक्षण केले, पण...

माहितीनुसार, सोमवारी ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमधील मोहम्मेदन स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात सवार शहरातील बीकेएसपी-३ मैदानावर लढत होती. मोहम्मेदन स्पोर्टिंग क्लब संघाचा कर्णधार म्हणून तमीम नाणेफेकीवेळी मैदानात आला. पहिल्या षटकात त्याने क्षेत्ररक्षण केले, पण नंतर त्याच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर त्याने मैदान सोडले आणि केपीजे स्पेशलाइज्ड हॉस्पिटल अँड नर्सिंग होम (पूर्वीचे फाजिलातुन्नेसा रुग्णालय) येथे तपासणीसाठी गेला, अशी माहिती सामन्याचे पंच देबब्रत पॉल यांनी दिली. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी हेलिपॅडकडे जात असताना त्याची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्याला पुन्हा आधीच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याच्या छातीत ब्लॉकेज असल्याचे निष्पन्न झाले.

टॉसदरम्यान तो एकदम उत्साही दिसत होता

"टॉसदरम्यान तो एकदम उत्साही दिसत होता," अशी माहिती बीकेएसपीचे मुख्य क्रिकेट प्रशिक्षक मॉन्टू दत्ता यांनी पत्रकारांना दिली. "जेव्हा त्याची तब्येत बिघडली, तेव्हा त्यानS स्वतःची कार घेऊन रुग्णालय गाठले. डॉक्टर तिथून त्याला सोडण्यास तयार नव्हते, पण तरीही तमीम स्वतःहून निघाला आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था स्वतःच करत होता."

BCB ने रद्द केली बैठक

या प्रकारानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दुपारी आयोजित केलेली नियोजित बोर्ड बैठक रद्द केली. बोर्ड अध्यक्ष फारुक अहमद व इतर सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत. रुग्णालयात जाण्यापूर्वी, "त्याची स्थानिक रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली, जिथे हृदयविकाराचा सौम्य त्रास असल्याचा संशय होता. त्याला ढाका येथे नेण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु हेलिपॅडकडे जाताना त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि त्याला तातडीने परत बोलावण्यात आले. नंतर वैद्यकीय अहवालात हा हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे स्पष्ट झाले," असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) मुख्य चिकित्सक डॉ. देबाशिष चौधरी यांनी स्पोर्ट्सस्टारला सांगितले. "आमच्या सर्वांसाठी हा कठीण काळ आहे. तो सध्या निरीक्षणाखाली आहे आणि वैद्यकीय पथक शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. सध्या आमच्याकडे एवढीच माहिती आहे, आम्ही रुग्णालयात जात आहोत, नंतर पुढील अपडेट दिले जातील," असेही त्यांनी सांगितले.

डॉक्टरांकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जाहीर

डॉक्टरांकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जाहीर करण्यात आले आहे. "तमीम आमच्याकडे चिंताजनक अवस्थेत परतला. त्याला हृदयविकाराचा झटका म्हणता येईल. आम्ही तातडीने अँजिओग्राम व अँजिओप्लास्टी करून अडथळा दूर केला. वैद्यकीय प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. सध्या तो निरीक्षणाखाली आहे. बीकेएसपीमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व रुग्णालयाने वेळीच समन्वय साधल्यामुळे तमीमला त्वरीत उपचार मिळू शकले."

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल