आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक विजेते, माजी ऑलिम्पियन, क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन  (Photo-X)
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक विजेते, माजी ऑलिम्पियन, क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे माजी ऑलिम्पियन तसेच दिग्गज क्रीडा प्रशासक राजा रणधीर सिंग यांचे बुधवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.

Swapnil S

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे माजी ऑलिम्पियन तसेच दिग्गज क्रीडा प्रशासक राजा रणधीर सिंग यांचे बुधवारी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानानुसार आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे.

रणधीर सिंग यांच्या पश्चात पत्नी विनिता आणि महिमा, सुनैना व राजेश्वरी या तीन मुली असा परिवार आहे. त्यांची मुलगी राजेश्वरी हीदेखील नेमबाज आहे. आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी नुकताच ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या संस्थेचे त्यांनी १९९१ ते २०१५ या काळात सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सचिव राजीव भाटिया यांनी शोक व्यक्त करताना, रणधीर सिंग यांचे भारतीय आणि जागतिक क्रीडा क्षेत्रातील योगदान अमूल्य असल्याचे सांगितले.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांनी १९८७ ते २०१० या प्रदीर्घ काळात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय २००१ ते २०१४ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य होते आणि २००३ मध्ये त्यांची जागतिक अमली पदार्थ विरोधी संस्थेमध्ये आयओसीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली होती.

पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व

रणधीर सिंग यांनी खेळाडू आणि प्रशासक अशा दोन्ही भूमिकांमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रावर आपली छाप सोडली. त्यांनी खेळाडू म्हणून पाच वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १९७८ मधील बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ट्रॅप शूटिंगमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते, ज्यासाठी १९७९ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ऑलिम्पिक चळवळ रूजवण्यात मोलाचा वाटा

पतियाळाचे तत्कालीन महाराज आणि क्रिकेटपटू भूपिंदर सिंग यांचे वंशज असलेल्या रणधीर सिंग यांना भारतीय क्रीडा प्रशासनात सर्वांना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात असे. देशात ऑलिम्पिक चळवळ रूजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचा हा क्रीडा वारसा त्यांच्या मुलींनीही पुढे चालवला आहे. त्यांची मुलगी राजेश्वरी हिने २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते, तर दुसरी मुलगी सुनैना हिने २०१८ मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्षपद भूषवले होते. रणधीर सिंग यांच्या निधनामुळे क्रीडा जगतातील आजी-माजी खेळाडू आणि प्रशासकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Mumbai : सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकला मुदतवाढ; अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्या १३ जूनपर्यंत दादर व ठाणे स्थानकापर्यंतच

पुण्यातील ऐतिहासिक सारसबाग दोन दिवस बंद; पोलीस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

'बायजूज' संस्थापकाला तुरुंगवासाची शिक्षा; सिंगापूर न्यायालयाचा आदेश प्रक्रियात्मक असल्याचा रवींद्रन यांचा दावा

Himachal Pradesh : सिमल्यात ७२ तासांत ७० हजार वाहनांची एन्ट्री

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ११५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ परदेशी नागरिकांना अटक