नवी दिल्ली : गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली या भारताच्या कन्यांनी शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत गायत्री-ट्रीसा यांच्या जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारून पदक सुनिश्चित केले आहे. याबरोबरच भारताचे यंदाच्या जागतिक स्पर्धेतील पहिले आणि एकमेव पदकदेखील पक्के झाले आहे.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सोमवारपासून जागतिक स्पर्धेच्या ३०व्या पर्वाला प्रारंभ झाला. भारताला २००९ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तसेच जानेवारी महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान निर्माण झालेल्या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटना (बीएआय) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांनी स्टेडियमच्या रचनेत व सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे एकूणच या स्पर्धेद्वारे भारतीय खेळाडूंची तसेच आयोजकांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, २३ वर्षीय गायत्री व २३ वर्षांचीच ट्रीसा यांना या स्पर्धेसाठी मानांकन लाभलेले नाही. त्यामुळे ते उपांत्य फेरीपर्यंत मजल मारतील, अशी कोणीही कल्पना केली नव्हती. मात्र शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या भारतीय जोडीने चीनच्या जिया यी फान आणि झांग शु शियान या चौथ्या मानांकित जोडीचा १६-२१, २१-१५, २१-१३ असा पराभव केला. १ तास ९ मिनिटे चाललेल्या या लढतीत विजय मिळवून ट्रीसा आणि गायत्री यांनी भारतासाठी आजवरच्या जागतिक स्पर्धांमध्ये महिला दुहेरीतील एकंदर दुसरे पदक पक्के केले. तसेच गेल्या तीन जागतिक स्पर्धांप्रमाणेच (२०२२, २०२३, २०२५) यंदाही भारताने किमान एक पदक जिंकण्याची मालिका कायम राखली आहे.
आता शनिवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत गायत्री-ट्रीसासमोर टॅन निंग व ल्यू शेंगशू या चीनच्या अग्रमानांकित जोडीचे आव्हान असेल. चीनची ही जोडी गतविजेती असून त्यांनी २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकदेखील जिंकले होते. त्यामुळे ट्रीसा-गायत्रीला आणखी एकदा पराक्रम करावा लागेल. बॅडमिंटनच्या जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाले, तरी किमान कांस्यपदक निश्चित असते. मात्र गायत्री-ट्रीसाकडून संपूर्ण देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
शुक्रवारी पहिल्या गेममधील पराभवानंतर भारतीय जोडीने आपल्या रणनीतीत बदल केला. या सामन्यापूर्वी चिनी जोडीविरुद्ध भारतीय जोडीची कामगिरी ०-३ अशी होती, परंतु भारतीय खेळाडूंनी संयम राखत अप्रतिम पुनरागमन केले. मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या सल्ल्यामुळे कठीण परिस्थितीत शांत राहण्यास मदत झाल्याचे ट्रीसाने सांगितले. पहिल्या गेममध्ये १-६ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय जोडीने झुंज दिली, पण गेम १५-२१ असा गमावला. दुसऱ्या गेममध्ये ५-१ ने मागे असताना ट्रीसा आणि गायत्रीने १३-१० अशी आघाडी घेतली आणि गेम २१-१५ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये ११-५ अशी भक्कम आघाडी घेत भारतीय जोडीने चिनी खेळाडूंवर दडपण आणले आणि अखेर बाजी मारली.
१५ वर्षांनी पदक; मात्र लक्ष्य अद्याप दूर
ट्रीसा-गायत्री यांनी भारतासाठी जागतिक स्पर्धेत महिला दुहेरीतील आजवरचे दुसरे पदक जिंकले. यापूर्वी २०११मध्ये ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी कांस्यपदक पटकावले होते. १५ वर्षांचा हा दुष्काळ आता संपुष्टात आला आहे. मात्र गायत्रीने आपले लक्ष्य अद्याप दूर असल्याचे सांगितले. “ऑलिम्पिक पदकविजेत्यांवर मिळवलेला हा विजय खास आहे. मात्र आम्ही आता फक्त पदक पक्के केले आहे. त्या पदकाचा रंग सोनेरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. आमचे लक्ष्य अद्याप दूर आहे,” असे गायत्री म्हणाली. गायत्री व ट्रीसा यांच्या या यशात प्रक्षिशक आणि गायत्रीचे वडील पुलेला गोपीचंद यांचेही मोलाचे योगदान आहे.