बांगलादेशला ८ धावांनी धूळ चारत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियालाही टी २० विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला. अत्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यातील एक व्हिडिओ आता व्हायरल झाला असून अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू गुलबदिन नईब चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ बघून, 'गुलबदिनला ऑस्कर द्या', अशी मागणी नेटकरी करीत आहेत. तर, 'चिटिंग' केल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांकडून केला जातोय.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेशसोबतच ऑस्ट्रेलियासाठीही हा सामना महत्त्वाचा होता. १३ व्या षटकात विजय मिळवल्यास बांगलादेशकडे उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. तर, अटीतटीचा सामना होऊन अफगाणिस्तानचा पराभव झाल्यास, चांगल्या रनरेटच्या आधारे ऑस्ट्रेलियालाही सेमीफायनलमध्ये धडक देणे शक्य होणार होते.
'वेळ वाया घालवा...गेम स्लो करा'
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला २० षटकांत अवघ्या ११५ धावा करता आल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरूवात खराब राहिली आणि अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमद १२ वे षटक टाकत होता. तेव्हा बांगलादेशची अवस्था ८१ धावांवर ७ गडी बाद अशी होती. पण त्याचवेळी पावसाची रिमझिम सुरू झाली. डकवर्थ लुईस नियमानुसार तेव्हा बांगलादेशला विजयासाठी ८३ धावा असणे गरजेचे होते. मात्र ते दोन धावांनी पिछाडीवर होते. पावसामुळे सामना पुन्हा सुरू न झाल्यास अफगाणिस्तानला विजयी घोषीत केले जाईल, ही बाब अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रोटच्या लक्षात आली. त्यांनी लगेच सीमारेषेवरुनच, 'वेळ वाया घालवा...गेम स्लो करा' असा संदेश हातवारे करुन दिला.
अन् गुलबदिन कोसळला...
क्षेत्ररक्षणासाठी पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदिनने प्रशिक्षकांचा इशारा ओळखला आणि पुढच्याच क्षणी तो मांडी पकडून खाली कोसळला. तेव्हा नूर पुढील चेंडू टाकण्यासाठी धाव घेतच होता. पण, गुलबदिन जखमी झाल्याचे वाटल्यामुळे आणि तो खाली पडल्याचे दिसताच मुख्य पंचांनी नूरला थांबवले. पावसाची रिपरिपही सुरू होती. त्यामुळे अखेर सामना थांबवण्यात आला. सुदैवाने पाऊस थांबल्याने सामना लगेच सुरू झाला. पण त्या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे चाहते मात्र चांगलेच संतापल्याचे दिसले. चिटिंग केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. सामना पुन्हा सुरू न झाल्यास ऑस्ट्रेलियाला माघारी परतावं लागणार होतं. मात्र पाऊस थांबल्यामुळे सामना लगेच सुरू झाला आणि वाद तिथे थांबला.
गुलबदिनला ऑस्कर द्या
गुलबदिनच्या अॅक्टिंगचा सामन्यावर काहीच परिणाम झाला नाही. नंतर सामना सुरू झाला आणि बांगलादेशला ११४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. अखेर १०५ धावांवर बांगलादेशचा संघ गारद झाला आणि अफगाणिस्तानने सेमीफायनलचे तिकिट मिळवत ऑस्ट्रेलियाला घरचा रस्ता दाखवला. परंतु, आता गुलबदिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी हसून लोटपोट झालेत. कारण, सामना पुन्हा सुरू झाल्यावर 'जखमी' गुलबदिनचा पाय लगेच 'ठिक' झाला आणि त्याने आपले पहिले षटकही टाकले. इतकेच नाही तर त्याच षटकात बांगलादेशचा आठवा गडीही बाद केला आणि सामन्यावर अफगाणिस्तानला पूर्ण पकड मिळाली. शिवाय, सामना जिंकल्यावरही आनंदाच्या भरात मैदानात सुसाट धावणाऱ्या अफगाणी खेळाडूंमध्येही गुलबदिन सर्वात पुढे होता. आता गुलबदिनचा व्हिडिओ बघून, 'याला ऑस्कर द्यायला पाहिजे' अशा एकाहून एक मजेशीर प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एक नजर मारुया नेटकऱ्यांच्या पोस्ट्सवर...
दरम्यान, आता २७ जून रोजी उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी तर अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेसोबत सामना असणार आहे.