एक्स @ICC
क्रीडा

चॅम्पियन्सचा जल्लोष; सांघिक कामगिरीचे फलित; जेतेपद देशवासीयांना समर्पित!

भारताचा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाने रविवारी रात्री ९.४८च्या सुमारास विजयी चौकार लगावला अन् बस्स्स... दुबईपासून ते मुंबईपर्यंत जगभरात पसरलेल्या तमाम भारतीयांनी एकच जल्लोष केला.

Swapnil S

मुंबई : भारताचा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाने रविवारी रात्री ९.४८च्या सुमारास विजयी चौकार लगावला अन् बस्स्स... दुबईपासून ते मुंबईपर्यंत जगभरात पसरलेल्या तमाम भारतीयांनी एकच जल्लोष केला. गेल्या १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोहित शर्माच्या शिलेदारांनी रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे संस्मरणीय जेतेपद मिळवले. एकंदर तिसऱ्यांदा भारताने ही स्पर्धा जिंकण्याची ही करामत केली. त्यामुळे रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत सगळीकडे जल्लोषाचे वातावरण होते.

संपूर्ण स्पर्धेत रोहितने केलेले कल्पक नेतृत्व, अपराजित राहून मिळवलेले जेतेपद, विराट कोहलीने निर्णायक लढतींमध्ये सिद्ध केलेले श्रेष्ठत्व, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, के. एल. राहुल यांनी मधल्या फळीत दिलेले योगदान आणि या सर्वांवर कडी म्हणजे भारतीय गोलंदाज विशेषत: फिरकीपटूंनी केलेली अफलातून कामगिरी यांसारख्या असंख्य सकारात्मक बाबींच्या बळावर भारताने यश संपादन केले. भारताने मिळवलेले देदीप्यमान यश हे सांघिक कामगिरीचे फलित आहे. त्यामुळे हे यश आपण देशवासीयांना समर्पित करतो, अशी भावनाही भारतीय खेळाडूंनी व्यक्त केली.

गेली ३ आठवडे रंगलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या पर्वात भारताने दुबईत आपले सर्व सामने खेळले. त्यामुळे अनेकांनी यावर टीकाही केली. मात्र एकाही लढतीत नाणेफेक न जिंकता भारताने विजय मिळवला, हेसुद्धा विसरता येणार नाही. एका खेळाडूवर विसंबून न राहता भारताने या स्पर्धेत छाप पाडली. प्रत्येक वेळी संघ दडपणात असताना कुणी ना कुणी पुढाकार घेतला. त्यामुळे भारताला एकंदर सातवी आयसीसी स्पर्धा जिंकता आली. १९८३ व २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, २००७ व २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ व २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने जेतेपद काबिज केले आहे.

भारताच्या या यशानंतर मुंबईतील दादर येथे फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. नवी दिल्ली, पंजाब, चेन्नई येथेही चाहत्यांनी रस्त्यावर येत आनंद साजरा केला. मरिन ड्राईव्ह येथे चॅम्पियन्स ट्रॉफीसह मिरवणूक काढून लोकांनी कल्ला केला. त्यामुळेच भारतीय संघाच्या या कामगिरीचे कौतुक करणे गरजेचे आहे. जसप्रीत बुमरासारख्या अव्वल गोलंदाजाची अनुपस्थिती, त्यातच कसोटीत न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खाल्लेला मार, हे सर्व बाजूला सारून भारताने चॅम्पियन्ससारखा खेळ केला. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात भारताने मिळवलेल्या या यशानिमित्ताने आजचे विशेष पान भारतीय संघ आणि त्यांच्या चाहत्यांना समर्पित.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल