क्रीडा

वेळेचे बंधन, धावांचा दंड आणि बरेच काही...आयसीसीकडून कसोटी क्रिकेटच्या नियमांत आमूलाग्र बदल; तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांत जुलैपासून अंमलबजावणी

कसोटी क्रिकेट अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियमांमध्ये काही आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी प्रकारात हे नियम तातडीने लागू करण्यात आले आहेत, तर एकदिवसीय व टी-२० प्रकारात १ जुलैपासून हे नियम अंमलात येतील.

Swapnil S

दुबई : कसोटी क्रिकेट अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियमांमध्ये काही आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी प्रकारात हे नियम तातडीने लागू करण्यात आले आहेत, तर एकदिवसीय व टी-२० प्रकारात १ जुलैपासून हे नियम अंमलात येतील. नियमांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता कसोटीतही षटकांच्या दरम्यान संघांना वेळेचे बंधन असेल, तर विविध चुकांमुळे त्यांना धावांची पेनल्टीही (दंड) भोगावी लागेल.

आयसीसीची २०२५-२०२७ची जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिका (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) सुरू झाली आहे. सध्या एकीकडे श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सुरू आहे. तसेच भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेसही प्रारंभ झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये षटकांची गती संथ राखल्याचा फटका गेल्या डब्ल्यूटीसी हंगामात इंग्लंडसह काही संघांना बसला. यामुळे त्यांचे गुण कमी झाले व परिणामी टक्केवारीवर परिणाम झाला. त्यामुळे त्या संघांचे अंतिम फेरीचे स्वप्न हुकले.

२०१९पासून आयसीसीने डब्ल्यूटीसी स्पर्धा सुरू केली. दर दोन वर्षांनी ‘टेस्ट मेस’साठी (मानाची गदा) खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत २०२१ व २०२३मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर २०२५मध्ये भारत अंतिम फेरीही गाठू शकला नाही. आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांनी कसोटीचे जगज्जेतेपद मिळवले आहे. आता २०२५-२७च्या नव्या हंगामात आयसीसीने तातडीने नवे नियम अंमलात आणले आहेत, तर काही जुन्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

आयसीसीने कसोटीत लागू केलेल्या नियमांपैकी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे वेळेचे बंधन. आता एकदिवसीय व टी-२० प्रमाणे कसोटीतही ६० सेकंदांच्या आत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरू करावे लागेल. तसे न झाल्यास पंचांकडून संघाला दोन वेळा ताकीद देण्यात येईल. मात्र तिसऱ्या वेळेस त्यांच्यावर पाच धावांची पेनल्टी आकारण्यात येईल. ८० षटके पूर्ण झाल्यावर तोपर्यंत देण्यात आलेल्या ताकीद रद्द होतील व पुन्हा नव्याने ताकीद देण्यात येईल.

आणखी एक महत्त्वाचे म्हणजे आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यावरील बंदी कायम राखली आहे. आयपीएलमध्ये बीसीसीआयने यावरील बंदी उठवली होती. मात्र आयसीसीने सध्या लाळेस मनाई कायम ठेवली आहे. त्यामुळे गोलंदाजांना घामाच्या बळावरच चेंडूला लकाकी द्यावी लागणार आहे. तसेच एखाद्या क्षेत्ररक्षकाने चुकून चेंडूला लाळ लावली, तर चेंडू बदलण्याची गरज नसल्याचेही आयसीसीने म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडूला लाळ लावली अथवा तो प्रेक्षकांमध्ये गेला, तरी तो बदलला जायचा किंवा चेंडूचे निर्जुंतकीकरण (सॅनिटायझेशन) केले जायचे.

याव्यतिरिक्त, खेळाडूंची खेळभावना जपण्यासाठीही आयसीसीने काही नियम अंमलात आणले आहेत. फलंदाजी तसेच गोलंदाजी करणाऱ्या संघांना बरोबरीने पारदर्शकपणे खेळ करावा लागणार आहे. क्रिकेटमधील खरेपणा टिकून राहण्यासह चाहत्यांचा अधिकाधिक विश्वास जिंकण्याच्या हेतूने हे नियम लागू करण्यात आले आहेत.

३५ षटकांनंतर फक्त एक चेंडू

एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून दोन्ही बाजूने दोन नव्या चेंडूंचा वापर करण्यात येतो. मात्र नव्या नियमांनुसार आता फक्त ३५व्या षटकापर्यंतच हे करता येईल. ३५व्या षटकाला गोलंदाजी करण्याला संघाला त्या दोन्ही चेंडूंपैकी एकाचीच निवड करून उर्वरित १५ षटके पूर्ण करावी लागतील. जेणेकरून बॅट आणि बॉलमधील संघर्ष कायम राहील. पावसामुळे सामना कधी फक्त २५ व त्यापेक्षा कमी षटकांचा झाला, तर संघाला एकच चेंडू संपूर्ण डावात वापरावा लागेल.

झेल योग्य असल्यास फक्त नो-बॉलची धाव

जर क्षेत्ररक्षकाने घेतलेला एखादा झेल मैदानावरील पंचांना खात्रीदायक वाटला नाही, तर ते तिसऱ्या पंचांची मदत घेतात. मात्र हा चेंडू नो-बॉल निघाला, तर झेल घेतला आहे की नाही, हे तपासलेसुद्धा जायचे नाही. आता नव्या नियमानुसार मात्र तिसरे पंच नो-बॉल असला तरी त्यावर क्षेत्ररक्षकाने पकडलेला झेल योग्य आहे का, ते पाहतील. जर झेल योग्य असेल, तर फक्त नो-बॉलचा रन फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल. जर झेल योग्य नसेल, तर नो-बॉलसह फलंदाजाने धावलेल्या धावाही त्याला मिळतील. क्रिकेटमध्ये एक धावही विजय-पराभवासाठी निर्णायक ठरू शकते.

कन्कशनसाठी पर्यायी खेळाडूंची यादी

आयसीसीमध्ये कन्कशनच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूच्या डोक्याला चेंडूमुळे मार लागला व तो सामन्यात पुढे भाग घेण्यास असमर्थ असेल, तर त्याच्या जागी पर्यायी खेळाडूची निवड करता यायची. मात्र या नियमाचा काही संघांना अतिरिक्त लाभ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे आता दोन्ही संघांना सामना सुरू होण्यापूर्वीच कन्कशनशी निगडित पर्यायी खेळाडूंची यादी सामनाधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे. त्यानुसार यष्टीरक्षक, एक उजव्या, डाव्या हाताचा फलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू व एक अष्टपैलू असे पर्यायी खेळाडू संघात असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जानेवारीत इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात शिवम दुबेने अर्धशतक झळकावले. मात्र अखेरच्या षटकात चेंडू डोक्याला लागल्याने त्याला कन्कशन सबआऊट करून हर्षित राणाला मैदानात पाठवण्यात आले. दुबे हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो, त्यामुळे हर्षितचा पर्याय निवडण्यात आला. हर्षितने सामन्यात ३ बळी मिळवून भारताला जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

‘डीआरएस’मध्ये फसू शकतो फलंदाज

बॅट-पॅडच्या गॅपमधून चेंडू गेला असेल व यष्टिरक्षकाने झेल घेतल्याने पंचांनी बाद दिले, तर फलंदाज रिव्ह्यू घेणे अपेक्षित असते. अशा स्थितीत रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की चेंडूचा बॅटला स्पर्श झालेला नाही. मात्र त्याचवेळी पॅडला मात्र चेंडूचा स्पर्श झालेला आहे, तर पंच तो फलंदाज ‘एलबीडब्ल्यू’ आहे की नाही, हे तपासतील. रिप्लेमध्ये चेंडू बॉल ट्रॅकिंगनुसार स्टम्प्सला लागल्याचे दिसून आले, तर फलंदाजाला आता पायचीत घोषित करता येईल. त्यामुळे फलंदाज झेलबाद नसला, तरी पायचीतच्या जाळ्यात अडकू शकतो. पूर्वी पंच फक्त फलंदाज झेलबाद आहे की नाही, इतकेच तपासायचे.

अपूर्ण धाव आणि जाणूनबुजून अपीलसाठी दंड

अनेकदा चेंडूचा झेल घेण्यापूर्वी जमिनीला स्पर्श झाल्याचे माहीत असूनही काही खेळाडू जोरजोरात पंचांकडे अपील करतात. आता असे आढळल्यास पंच रिप्ले पाहून या चेंडूला नो-बॉल घोषित करू शकतात. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाने एखादी धाव अपूर्ण धावली, तर त्या संघाला पाच धावांचा दंड दिला जाईल. तसेच गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणता फलंदाज स्ट्राइकवर हवा आहे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये फुल टाइम रिप्लेसमेंट

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आता फुल टाइम रिप्लेसमेंटसंदर्भातील नियमही लागू करण्यात येणार आहे. बदली खेळाडूसाठी ‘कन्कशन’साठी जशास तसा खेळाडू निवडावा लागेल. स्नायूंच्या किंवा अन्य एखाद्या दुखापतीसाठी हा नियम लागू होणार नाही. मैदानातील पंच दुखापत पाहून यासंदर्भात निर्णय घेतील. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा नियम सक्रिय करावा की, नाही हे त्या त्या देशावर अवलंबून असेल.

चुरस कायम राखण्यासाठी नवे नियम

चेंडू-फळीमधील चुरस कायम राखण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच मेरिलीबोन क्रिकेट क्लब आणि सहाय्यक समितीने सुचवलेल्या सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या काही नियमांत बदल करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत, असे आयसीसीने निवेदनात म्हटले.

काही वर्षांपूर्वी आयसीसीने रनरची संकल्पना बंद केली. फलंदाजाला दुखापत झाली, तरीसुद्धा त्याला आता धावपटू घेण्याची परवानगी नाही. यावर आयसीसी विचारविनिमय करत आहे. तसेच कसोटीच्या दिवसांची संख्या पाचवरून चार करण्याबाबतही आयसीसीने प्रस्ताव स्वीकारला आहे. मात्र २०२७नंतरच याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या मुख्य संघांतील सामने हे पाच दिवसांचेच खेळवण्यात येतील. फक्त बांगलादेश, झिम्बाब्वे या संघांतील सामने चार दिवसांचे खेळवले जाऊ शकतात. त्यामुळे आयसीसी काय निर्णय घेणार, हे पाहणे रंजक ठरेल. माजी क्रिकेटपटूंनी मात्र कसोटीचे दिवस पाचच ठेवावे, असे सातत्याने सुचवले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video