दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघातील फिरकीपटू श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी आयसीसीच्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर वेगवान गोलंदाज क्रांती गौड आणि नंदिनी शर्मा यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे.
भारताने मायदेशात झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवत २-० अशी आघाडी घेतली आहे. रायपूर येथे झालेल्या या दोन्ही सामन्यांत भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली.
नंदिनी शर्मा हिने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत तीन बळी घेतले असून ती सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे अव्वल आहे. या कामगिरीच्या जोरावर तिने टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत २६ स्थानांची झेप घेत ४५वे स्थान मिळवले आहे. क्रांती गौडनेही नऊ स्थानांची प्रगती करत ४३वे स्थान पटकावले आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध किफायतशीर गोलंदाजी करणाऱ्या श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्रान्स-टास्मन मालिकेतील पहिल्या सामन्यानंतरही टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत काही बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडने एका स्थानाची प्रगती करत आठवे स्थान मिळवले.
न्यूझीलंडच्या जेस केरने पाच स्थानांची झेप घेत १७वे, ब्री इलिंगने सहा स्थानांची प्रगती करत २३वे, तर नॅन्सी पटेलने पाच स्थानांची सुधारणा करत ३५वे स्थान मिळवले.
मॅडी ग्रीन, जॉर्जिया प्लिमरची प्रगती
सिडनी येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर निसटता विजय मिळवला. मात्र, अद्ययावत टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडच्या मॅडी ग्रीन आणि जॉर्जिया प्लिमर यांनी उल्लेखनीय प्रगती केली. ग्रीनने तीन स्थानांची सुधारणा करत ३४वे, तर प्लिमरने १३ स्थानांची झेप घेत ४८वे स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज बेथ मूनीने जागतिक टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे.