पर्थ : तब्बल सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणाऱ्या रोहित शर्मा (१४ चेंडूंत ८ धावा) आणि विराट कोहली (८ चेंडूंत ०) यांचा बार फुसका निघाला. एकंदर सांघिक कामगिरीतही भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ७ गडी व २९ चेंडू राखून सहज वर्चस्व गाजवले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना गुरुवारी खेळवण्यात येईल.
पर्थच्या ओप्टस स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पावसाने ३ ते ४ वेळा विघ्न आणले. अखेरीस शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने ९ बाद १३६ धावांपर्यंत जेमतेम मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियापुढे डकवर्थ-लेविस पद्धतीनुसार १३१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. कर्णधार मिचेल मार्शच्या ५२ चेंडूंतील नाबाद ४६ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांत हे लक्ष्य गाठून एकतर्फी विजय नोंदवला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे खरे शिल्पकार हे गोलंदाज होते. विशेषत: जोश हेझलवूडने ७ षटकांत २ बळी मिळवताना फक्त २० धावा दिल्या. त्याशिवाय मिचेल ओव्हन आणि फिरकीपटू मॅथ्यू कुन्हेमन यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. आता भाऊबीजच्या मुहूर्तावर गुरुवार, २३ ऑक्टोबरला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यश संपादन करून भारत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधेल, अशी अपेक्षा आहे. २०२५ या वर्षातील भारताचा हा एकदिवसीय प्रकारात पहिलाच पराभव ठरला, हे विशेष.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. त्यानंतर उभय संघांत ५ टी-२० सामनेही खेळवण्यात येणार आहेत. त्यातच रोहित आणि विराट हे दोन्ही अनुभवी खेळाडू पहिल्या एकदिवसीय सामन्याद्वारे सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. त्यामुळे या दोघांच्याच कामगिरीकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून होते. दोघेही मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताकडून अखेरचे खेळले होते. रोहितच्या नेतृत्वात भारताने ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर मे महिन्यात प्रथम रोहितने, मग विराटने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली.
२०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याच्या हेतूने आता ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय गिलकडे सोपवण्यात आले आहे. मात्र गिलच्या नेतृत्वात पहिल्याच लढतीत भारताच्या पदरी निराशा पडली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ढगाळ वातावरण आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारताचा कस लागणार, हे स्पष्ट होते. भारताने या लढतीसाठी नितीश रेड्डीला पदार्पणाची संधी दिली. कुलदीप यादवला मात्र संघाबाहेर ठेवल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या.
गिल आणि रोहित या आजी-माजी कर्णधारांची जोडी मैदानात उतरली, तेव्हा तमाम भारतीय चाहते टीव्हीकडे नजरा लावून होते. सोमवारी देशभरात दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याने रविवारी त्यापूर्वी भारताचे फलंदाज चौकार-षटकारांची आतषबाजी करतील, अशी अपेक्षा होती. गिल व रोहित यांनी प्रत्येकी एक-एक चौकार लगावून चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या. मात्र तिसऱ्याच षटकात हेझलवूडच्या उसळणाऱ्या चेंडूवर रोहित फसला व ८ धावांवर त्याचा स्लीपमध्ये रेनशॉने झेल घेतला.
त्यानंतर मैदानात विराटचे आगमन झाले. मात्र मिचेल स्टार्कने त्याला तब्बल सहाव्या स्टम्पवर चेंडू टाकून ड्राइव्ह खेळण्यास भाग पाडले आणि बॅडच्या कडेला लागून चेंडू पॉइंटच्या दिशेने उभ्या असलेल्या कूपर कोनोलीच्या हातात विसावला. विराटला ८ चेंडूंत भोपळाही फोडता आला नाही. हे कमी म्हणून की काय गिलसुद्धा लेगसाईडच्या बाहेरील चेंडूवर फसला व १० धावांवर माघारी परतला. त्यामुळे भारताची ८ षटकांत ३ बाद २५ अशी अवस्था होती.
पावसामुळे मग काही वेळ खोळंबा झाल्यावर श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हेझलवूडने श्रेयसला (११) बाऊन्सवर बाद करून भारताचा चौथा धक्का दिला. पुन्हा पावसामुळे जवळपास तासभर वाया गेल्यावर अक्षरने के. एल. राहुलच्या साथीने संघाची गाडी पुढे नेली. सामना २६ षटकांचाच झाल्याने दोघांनाही फटकेबाजी करण्याशिवाय पर्याय नव्हता. अक्षरने ३ चौकारांसह ३१, तर राहुलने प्रत्येकी २ चौकार-षटकारांसह ३१ चेंडूंत ३८ धावा केल्या. कुन्हेमनने अक्षर व वॉशिंग्टन सुंदरचा (१०) लागोपाठच्या षटकात अडसर दूर केला, तर राहुलही मोठा फटका खेळण्याच्या नादात २५व्या षटकात ओव्हनचा शिकार ठरला. मग नितीशने ११ चेंडूंत नाबाद १९ धावा करताना अखेरच्या षटकात दोन षटकार लगावले व भारताला १३६ धावांपर्यंत नेले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अर्शदीपने ट्रेव्हिस हेडला (८) स्वस्तात बाद केले. मात्र मार्शने एका बाजूने आक्रमण करताना २ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या. त्याला जोश फिलिपे (२९ चेंडूंत ३७) व रेनशॉ (२४ चेंडूंत २१) यांची उत्तम साथ लाभली. अक्षरने मॅथ्यू शॉर्ट (८), तर सुंदरने फिलिपेला माघारी पाठवले. मात्र तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का झाला होता. अखेरीस २२व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रेनशॉने एकेरी धाव घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता गुरुवारी ऑस्ट्रेलिया मालिकेत विजयी आघाडी घेणार की भारत बरोबरी साधणार, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच रोहित-विराटकडूनही मोठ्या खेळीची सर्वांना आशा असेल.
शुभमन गिल हा कर्णधार म्हणून तिन्ही प्रकारांतील (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) पहिल्याच सामन्यात पराभव पत्करणारा भारताचा दुसरा कर्णधार ठरला. विराट कोहलीच्या नावे आधी हा नकोसा विक्रम होता. एकंदर विश्वात ९ कर्णधारांवर अशी वेळ ओढवली आहे.
रोहितचा हा ५००वा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारताकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांच्या यादीत तो आता पाचव्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकर (६६४), विराट कोहली (५५१), महेंद्रसिंह धोनी (५३५) आणि राहुल द्रविड (५०४) हे खेळाडू भारतासाठी ५००हून अधिक सामने खेळलेले आहेत.
संक्षिप्त धावफलक
भारत : २६ षटकांत ९ बाद १३६ (के. एल. राहुल ३८, अक्षर पटेल ३१; जोश हेझलवूड २/२०, मिचेल ओव्हन २/२०) पराभूत वि.
ऑस्ट्रेलिया : २१.१ षटकांत ३ बाद १३१ (मिचेल मार्श नाबाद ४६, जोश फिलिपे ३७, अर्शदीप सिंग १/३१)
सामनावीर : मिचेल मार्श