एक्स (बीसीसीआय)
क्रीडा

IND vs BAN, 2nd Test : पहिल्या दिवशी पावसाचीच बॅटिग! मायदेशातील कसोटीत टीम इंडियाचा ९ वर्षांत प्रथमच 'हा' निर्णय

भारत-बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून कानपूर येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर अपेक्षेप्रमाणे पावसाने वर्चस्व गाजवले.

Swapnil S

कानपूर : भारत-बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून कानपूर येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर अपेक्षेप्रमाणे पावसाने वर्चस्व गाजवले. वरुणराजाने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे पहिल्या दिवशी ३५ षटकांचाच खेळ शक्य झाला. त्यामध्ये बांगलादेशने ३ बाद १०७ धावांपर्यंत मजल मारली. आकाश दीपने (३४ धावांत २ बळी) भारताकडून प्रभावी गोलंदाजी केली.

९ वर्षांत प्रथमच मायदेशात नाणेफेक जिंकून गोलंदाजी

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गेल्या ९ वर्षांत प्रथमच भारतीय संघाने मायदेशातील कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने असे केले होते. भारताने या कसोटीसाठी संघात एकही बदल केला नाही. पावसामुळे सामना एक तास उशिरा सुरू झाला. त्यावेळी काहीसे ढगाळ वातावरण होते तसेच हवाही वाहत होती. त्यामुळे सुरुवातीचा एक तास वेगवान गोलंदाजांना पोषक ठरणारा होता.

मात्र बांगलादेशचे सलामीवीर झाकीर हसन व शदमन इस्लाम यांनी जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराजचा ८ षटकांचा मारा संयमीपणे खेळून काढला. सुरुवातीच्या ४० मिनिटांत त्यांनी २६ धावा केल्या. मात्र यांपैकी २१ धावा शदमनच्या होत्या, तर झाकीर शून्यावरच होता. अखेर नवव्या षटकात रोहितने आकाशच्या हाती चेंडू सोपवला व त्याने वैयक्तिक पहिल्याच षटकात झाकीरला शून्यावरच बाद केले. स्लीपमध्ये यशस्वी जैस्वालने झाकीरचा अप्रतिम झेल टिपला.

त्यानंतर चार षटकांच्या अंतरात आकाशने शदमनला २४ धावांवर पायचीत पकडले. यावेळी रिव्ह्यूचा भारताला लाभ झाला. त्यानंतर कर्णधार नजमूल होसेन शांतो व मोमिनूल हक यांची जोडी जमली. उपहारापर्यंत बांगलादेशने २६ षटकांत २ बाद ७४ धावा केल्या. मग दुसऱ्या सत्रातही या दोघांनी चांगली फलंदाजी करताना तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भर घातली. अखेर रविचंद्रन अश्विनने शांतोला ३१ धावांवर पायचीत पकडले. ३५ षटकांत १०७ धावा झाल्यावर पावसाचे आगमन झाले. त्यावेळी काळोखही प्रचंड होता व जवळपास १ तास प्रतीक्षा करूनही पाऊस थांबला नाही. त्यामुळे पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ लवकर समाप्त केला. दिवसअखेर मोमिनूल ४०, तर मुशफिकूर रहिम ६ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या दिवशीही पावसाचे सावट कायम असून खेळ अर्धा तास लवकर सुरू होऊ शकतो.

बांगलादेशच्या चाहत्याला मारहाण

या कसोटीतील पहिल्या दिवशी उपहाराच्या समयी (लंच ब्रेक) ग्रीन पार्क स्टेडियममधील चाहत्यांनी बांगलादेशचा चाहता ‘सुपर फॅन रॉबी’ यास मारहाण केल्याचे समजते. हा चाहता मोहम्मद सिराजला उद्देशून टिप्पणी करताना आढळला, असे तेथील उपस्थित जमावाने सांगितले. त्यामुळे या चाहत्यावर भारतीय पाठिराख्यांनी आक्रमण केले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. सी स्टँडच्या बाल्कनीतून रॉबी वाघाच्या पोशाखात सामना पाहत होता. सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना हा चाहता त्याला काही तरी म्हणाला, असे समजते. मात्र रॉबीने हे आरोप फेटाळले आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?