क्रीडा

IND vs ENG 2025 : लॉर्ड्सची खेळपट्टी आव्हानात्मक; भारताचे फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांचा इशारा, बुमराचे पुनरागमन पक्के

भारत-इंग्लंड यांच्यात १० जुलैपासून ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी गवताने भरलेली आणि उसळी घेणारी खेळपट्टी वापरण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे यापूर्वीच्या दोन सामन्यांच्या तुलनेत ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक आव्हानात्मक असेल, असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी व्यक्त केले.

Swapnil S

लंडन : भारत-इंग्लंड यांच्यात १० जुलैपासून ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी गवताने भरलेली आणि उसळी घेणारी खेळपट्टी वापरण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे यापूर्वीच्या दोन सामन्यांच्या तुलनेत ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक आव्हानात्मक असेल, असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी व्यक्त केले.

२५ वर्षीय शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने रविवारी बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला ३३६ धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मुख्य म्हणजे भारताने एजबॅस्टन येथे प्रथमच एखादी कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत मालिकेतील दोन्ही कसोटी पाचव्या दिवसापर्यंत लांबल्या आहेत. मात्र यामध्ये फलंदाजांचेच वर्चस्व दिसून आले. पहिल्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या डावात ३७१ धावांचा यशस्वी पाठलाग केला, तर दुसऱ्या कसोटीत भारताने दोन्ही डावांत मिळून तब्बल १००० पेक्षा अधिक धावा केल्या. गोलंदाजांना सहाय्य नसल्याने अनेक दिग्गजांनी खेळपट्टीवर टीका केली. स्वत: इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनीसुद्धा तिसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाजांना पोषक व अतिरिक्त उसळी घेणाऱ्या (बाऊन्स) खेळपट्टीची मागणी केली आहे. मंगळवारी भारतीय संघाने खेळपट्टीची पाहणी केली, त्यावेळी खेळपट्टीवर पुष्कळ गवत दिसून आले.

“आज आम्ही खेळपट्टीची पाहणी केली, तेव्हा पहिल्या दोन कसोटींच्या तुलनेत या खेळपट्टीवर अधिक गवत दिसून आले. जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरी लॉर्ड्सवरच झाली होती. तेव्हा कगिसो रबाडा, पॅट कमिन्स यांनी उत्तम गोलंदाजी केली होती. त्यामुळे येथे चेंडूला अधिक गती व उंची मिळेल. स्विंगही पुरेसा उपलब्ध असेल, असे दिसते. फलंदाजांसाठी ही खेळपट्टी आव्हानात्मक ठरू शकते,” असे कोटक म्हणाले.

“मात्र सूर्यप्रकाश पुरेसा असेल तर फलंदाज धावाही वसूल करू शकतात. भारतीय फलंदाजांना अनावश्यक फटके खेळणे टाळले, तर येथे तुम्हाला सहज धावा मिळतील. आऊटफील्ड वेगवान असल्याने चेंडूही त्वरित सीमारेषेजवळ पोहोचेल. खेळपट्टीवर जितका वेळ तुम्ही उभे राहाल, तितकी फलंदाजी सोपी होईल,” असेही कोटक यांनी नमूद केले.

चांगल्या खेळपट्टीवर गोलंदाजांना आदर देणे गरजेचे आहे. त्यावेळी तुम्ही अतिशहाणपणा दाखवून नको तो फटका खेळलात, तर तुमची विकेट जाणारच, असे कोटक यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमरा संघात परतणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र त्यासाठी कोण संघाबाहेर जाईल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या