बीसीसीआय
क्रीडा

IND vs NZ : प्रतिष्ठेसाठी लढाई! व्हाइटवॉश टाळण्याचे भारतापुढे आव्हान; आजपासून तिसरा कसोटी सामना

भारतीय क्रिकेट संघावर तब्बल १२ वर्षांनी मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. मात्र आता तब्बल २४ वर्षांनी मायदेशातच व्हाइटवॉश पत्करण्याचे सावटही भारतावर आहे.

Swapnil S

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

भारतीय क्रिकेट संघावर तब्बल १२ वर्षांनी मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. मात्र आता तब्बल २४ वर्षांनी मायदेशातच व्हाइटवॉश पत्करण्याचे सावटही भारतावर आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत प्रतिष्ठा जपण्यासह व्हाइटवॉश टाळण्याचे आव्हान भारतापुढे असेल. तसेच चाहत्यांना दिवाळीच्या दिवसांत आनंद वार्ता देण्याचेही त्यांचे ध्येय असेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला न्यूझीलंडने पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये सहज धूळ चारली. पहिल्या कसोटीच्या तुलनेत दुसऱ्या कसोटीत फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांची अधिक तारांबळ उडाली. त्यामुळे २०१२नंतर प्रथमच भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली. भारताचा सलग १८ मालिका विजयाचा रथही किवी संघाने रोखला. यापूर्वी १९९९- २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला भारतातच २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे नमवले होते. त्यानंतर भारताने मायदेशात कोणत्याही कसोटी मालिकेतील सर्व सामने गमावलेले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ यावेळी दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ मालिका सामन्यांची कसोटी खेळणार आहे. २२ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होईल.

दुसरीकडे, टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने प्रथमच भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी २०२० मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या मालिकेत भारताला २-० असे किवी संघाने नमवले होते. त्यामुळे ते आता भारतातही याच कामगिरीची पुनरावृत्ती करून मालिकेत निर्भेळ करण्यास आतुर यश संपादन असतील. केन विल्यम्सन या लढतीसाठी अनुपलब्ध असला समतोल असल्याने तरी किवी संघ त्यांना चिंता करण्याचे कारण नाही.

एजाझच्या कामगिरीची आठवण

२०२१मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात वानखेडेवर झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने डावात १० बळी मिळवले होते. आता ३ वर्षांनी एजाझ पुन्हा वानखेडेवर परतला आहे. तसेच रचिन रवींद्र व मिचेल सँटनर या डावखुऱ्या खेळाडूंवर किवी संघाची भिस्त आहे. लॅथम, डेवॉन कॉन्वे यानीही संघासाठी आतापर्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

मुंबईकरांवर लक्ष

रोहित, यशस्वी जैस्वाल व सर्फराझ खान असे मुंबईचे तीन खेळाडू घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडेवर खेळणार आहेत. त्यामुळे या मुंबईच्या त्रिकुटाकडून चाहत्यांना दमदार फटकेबाजी अपेक्षित आहे. रोहितची बॅटही गेल्या काही काळापासून थंड आहे. तसेच गोलंदाजीत जसप्रीत बुमरा वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. या लढतीतही रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांचे फिरकी त्रिकुट भारतीय संघात कायम असेल, असे समजते.

विराटकडून मोठी खेळी अपेक्षित

विराट कोहलीला मार्च २०२३ नंतर मायदेशातील कसोटी सामन्यांत एकही शतक झळकावता आलेले नाही. या मालिकेतील २ सामन्यांतही त्याने एकच अर्धशतक साकारले आहे. त्यामुळे विराटकडून चाहत्यांना मोठी खेळी अपेक्षित आहे.

निरभ्र आकाश आणि फिरकीपटूंना सहाय्य

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असेल, असे समजते. बंगळुरूत वेगवान गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर भारताचा ४६ धावांत खुर्दा झाला. त्यानंतर पुणे येथे ३ दिवसांतच लढतीचा निकाल लागला. वानखेडेवरही सामना पाचव्या दिवसांपर्यंत लांबणे कठीण आहे. येथे लाल मातीच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळण घेईल. तसेच पावसाची मूळीच शक्यता नसून कडक उन्हात खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चाचपणी होईल.

- उभय संघांत आतापर्यंत २२-१५ झालेल्या ६४ सामन्यांपैकी भारताने २२, तर न्यूझीलंडने १५ कसोटी जिंकलेल्या आहेत. उर्वरित २७ लढती अनिर्णित राहिल्या आहेत. मात्र तूर्तास तरी किवी संघाचेच पारडे जड आहे.

प्रतिस्पर्धी संघ

-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा.

-न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे, जेकब टफी, मॅट हेन्री, डॅरेल मिचेल, विल्यम ओरूरके, एजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी, विल यंग.

वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ (इंग्रजी भाषेत), कलर्स सिनेप्लेक्स (हिंदी) वाहिनी आणि जिओ सिनेमा अॅप

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी