दाम्बुला : फिरकीपटू दीप्ती शर्माने (२० धावांत ३ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्याला अन्य गोलंदाजांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचा दणक्यात प्रारंभ करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ गडी आणि ३५ चेंडू राखून फडशा पाडला.
दाम्बुलाच्या रणगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानला १९.२ षटकांत १०८ धावांत गुंडाळल्यावर भारताने १४.१ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. स्मृती मानधना (३१ चेंडूंत ४५ धावा) आणि शफाली वर्मा (२९ चेंडूंत ४०) यांनी ५७ चेंडूंत ८५ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद ५) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद ३) यांनी भारताचा विजय साकारला. आता भारताचा रविवार २१ तारखेला संयुक्त अरब अमिरातीशी दुसरा सामना होईल. अ-गटात भारताने या विजयासह २ गुण मिळवून अग्रस्थान काबिज केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव घसरला. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी २ गडी बाद करताना त्यांची ४ बाद ५९ अशी अवस्था केली. मग दीप्तीने कर्णधार निडा डार (८), तुबा हसन (२२) यांचे अडथळे दूर केले. श्रेयांका पाटीलनेसुद्धा दोन बळी मिळवले. त्यामुळे पाकिस्तानला जेमतेम १०८ धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीने ९ चौकारांसह ४५, तर शफालीने ६ चौकार व १ षटकारासह ४० धावा फटकावून दमदार सलामी नोंदवली. या दोघींना अर्धशतकाने हुलकावणी दिल्यावर दयालन हेमलता (१४) स्वस्तात बाद झाली. मात्र हरमनप्रीत व जेमिमाने संघाला विजय मिळवून दिला. दीप्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दरम्यान, अ-गटातील अन्य लढतीत नेपाळने संयुक्त अरब अमिरातीचा ६ गडी राखून पराभव केला. अमिरातीला ११५ धावांत रोखल्यावर नेपाळने १६.१ षटकांत विजय मिळवला. नेपाळचा संघ गटात दुसऱ्या स्थानी असून आता त्यांची पाकिस्तानशी गाठ पडेल.
संक्षिप्त धावफलक
-पाकिस्तान : १९.२ षटकांत सर्व बाद १०८ (तुबा हसन २२, सिद्रा अमिन २५; दीप्ती शर्मा ३/२०, रेणुका सिंग २/१४) पराभूत वि.
-भारत : १४.१ षटकांत ३ बाद १०९ (स्मृती मानधना ४५, शफाली वर्मा ४०; अरूब शहा २/९)
-सामनावीर : दीप्ती शर्मा