IND VS SA T20 WC26: फलंदाजांची हाराकिरी! दक्षिण आफ्रिकेकडून भारत ७६ धावांनी पराभूत Photo : PTI
क्रीडा

IND VS SA T20 WC26: फलंदाजांची हाराकिरी! दक्षिण आफ्रिकेकडून भारत ७६ धावांनी पराभूत

गोलंदाजांनी सुरुवातीला केलेल्या अप्रतिम कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला सुपर-८ फेरीतील पहिल्याच सामन्यात ७६ धावांनी हार पत्करावी लागली.

Swapnil S

अहमदाबाद : गोलंदाजांनी सुरुवातीला केलेल्या अप्रतिम कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला सुपर-८ फेरीतील पहिल्याच सामन्यात ७६ धावांनी हार पत्करावी लागली.

डेव्हिड मिलरचे अर्धशतक तसेच त्याला मिळालेली डेवाल्ड ब्रेविस आणि त्रिस्तान स्टब्स यांची साथ यामुळे दक्षिण आफ्रिकेने ७ बाद १८७ धावा रचल्या. हे लक्ष्य गाठताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपेशल निराशा केल्यामुळे भारताचा डाव १८.५ षटकांत १११ धावांवर संपुष्टात आला. शिवम दुबेची ४२ धावांची झुंज व्यर्थ ठरली. भारताने ७६ धावांनी पराभव पत्करल्यामुळे आता पुढील दोन सामन्यांत भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तरच भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होऊ शकेल.

दक्षिण आफ्रिकेचे १८८ धावांचे उद्दिष्ट गाठताना भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या इशान किशनला आयडेन मार्करमने आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीवर शून्यावर बाद केले. तीन चेंडूंनंतर तिलक वर्मानेही मार्के यान्सेनच्या गोलंदाजीवर आपली विकेट फेकली. गेल्या तीन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्माने २ चौकार आणि १ षटकारासह १५ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव (१८) आणि अभिषेक शर्मा (१५) यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असताना, दोघांनीही निराशा केली.

अक्षर पटेलच्या जागी संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही संधीचे सोने करता आलेले नाही. अवघ्या ११ धावा काढून तो माघारी परतला. त्यामुळे १० षटकांत भारताची अवस्था ५ बाद ६० अशी होती. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३५ धावा जोडल्या. भारताच्या डावातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. मात्र केशव महाराजने लागोपाठ हार्दिक पंड्या (१८), रिंकू सिंग (०) आणि अर्शदीप सिंग (१) यांना माघारी पाठवत भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या.

तत्पूर्वी, डेव्हिड मिलरने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या सुपर-८ फेरीतील लढतीत ७ बाद १८७ धावा उभारल्या. मिलरने ३५ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी साकारली. त्याला चांगली साथ देताना युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याने २९ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४५ धावांचे योगदान दिले. तसेच त्रिस्तान स्टब्स याने २४ चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावा फटकावल्या.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दुसऱ्याच षटकांत क्विंटन डीकॉकला (६) त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतरच्या षटकांत अर्शदीप सिंगने सलामीवीर आयडेन मार्करम (४) याचा अडसर दूर केला. बुमराने पुढच्या षटकांत रायन रिकेलटन (७) यालाही मैदानावर स्थिरावण्याची संधी न देता शिवम दुबेकरवी झेलबाद केले. ४ षटकांत ३ बाद २० अशी आफ्रिकेची अवस्था असताना, ब्रेविस आणि मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेला चांगल्या स्थितीत आणून ठेवले. अखेर शिवम दुबेने ब्रेविसला अभिषेक शर्माकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली.

मिलरने दुबेला षटकार ठोकत २६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्रिस्तान स्टब्सने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला १८५ धावांचा टप्पा पार करून दिला. त्याने हार्दिक पंड्याच्या अखेरच्या षटकांत शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. भारताकडून जसप्रीत बुमराने तीन तर अर्शदीपने दोन विकेट्स टिपल्या. वरूण चक्रवर्ती आणि शिवम दुबेने प्रत्येकी एक बळी मिळवला.

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार