Asian Para Games 2026 : पदकांचा धडाका कायम; भारताची दिवसभरात ५ सुवर्णांसह तब्बल २९ पदकांना गवसणी 
क्रीडा

Asian Para Games 2026 : पदकांचा धडाका कायम; भारताची दिवसभरात ५ सुवर्णांसह तब्बल २९ पदकांना गवसणी

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय ॲथलेटिक्सपटूंनी दमदार कामगिरी करत बुधवारी पाच सुवर्णांसह एकूण २२ पदकांची कमाई केली. तसेच दिवसभरात भारताने एकूण २९ पदके पटाकावली. या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने पदकतालिकेत पाचवे स्थान पटकावले.

Swapnil S

नागोया : आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय ॲथलेटिक्सपटूंनी दमदार कामगिरी करत बुधवारी पाच सुवर्णांसह एकूण २२ पदकांची कमाई केली. तसेच दिवसभरात भारताने एकूण २९ पदके पटाकावली. या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने पदकतालिकेत पाचवे स्थान पटकावले. धावपटू सिमरन, उंच उडीपटू प्रवीण कुमार आणि गोळाफेकपटू सचिन खिलारी यांनी आपापल्या स्पर्धांमध्ये नवीन स्पर्धा विक्रम नोंदवून भारताच्या यशात मोलाची भर घातली.

सिमरनने महिलांच्या १०० मीटर टी१२ प्रकारात, प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी४४/६४ प्रकारात, तर सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक एफ४६ प्रकारात सुवर्णपदक जिंकले. दिलीप गावित (पुरुष १०० मीटर टी४७) आणि आयुष वर्मा (पुरुष गोळाफेक एफ५३) यांनीही सुवर्णपदकांवर नाव कोरले.

भारताने आतापर्यंत १४ सुवर्ण, २३ रौप्य आणि २७ कांस्य अशी एकूण ६४ पदके जिंकली आहेत. त्यापैकी १३ सुवर्णपदके ॲथलेटिक्समधील आहेत. नेमबाजीसदृश पॅरा-तिरंदाजी, पोहणे आणि पॉवरलिफ्टिंगमध्येही भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई केली.

सिमरनची विक्रमी सुवर्णझेप

दृष्टिहीन धावपटू सिमरनने १०० मीटर शर्यतीत १२.०२ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तिने यापूर्वी २०० मीटरमध्येही सुवर्णपदक पटकावले होते. विशेष म्हणजे, अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन्ही शर्यतींमध्ये स्पर्धा विक्रम नोंदवण्याचा पराक्रम तिने केला. कठोर शाकाहारी आहारामुळे मर्यादित पर्याय उपलब्ध असतानाही तिने थकव्यावर मात करत ही कामगिरी केली. इराणच्या हाजर सफरजादेहला १२.३० सेकंदांच्या वेळेसह रौप्यपदक मिळाले.

प्रीती पालने महिलांच्या १०० मीटर टी३५ प्रकारात रौप्यपदक जिंकले. तिने यापूर्वी २०० मीटरमध्येही दुसरे स्थान मिळवले होते. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकलेल्या प्रीतीने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. एकूणच भारताने बुधवारी केलेल्या पदकांच्या लयलूटमुळे पदकतालिकेत भारताचे पाचवे स्थान भक्कम झाले आहे.

तिरंदाजी, जलतरण, पॉवरलिफ्टिंगमध्येही यश

दोन्ही हात नसलेली तिरंदाज शीतल देवी आणि पायल नाग यांनी महिलांच्या दुहेरी कंपाउंड प्रकारात रौप्यपदक मिळवले. अंतिम फेरीत त्यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

दृष्टिहीन जलतरणपटू रवी कार्तिक बुडिगिनाने पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक एस१३ प्रकारात रौप्यपदक पटकावले. हिमांशू नंदालने पुरुषांच्या ब्रेस्टस्ट्रोक एसबी१३ प्रकारात कांस्यपदक जिंकले. पॉवरलिफ्टिंगमध्ये पोलिओग्रस्त कस्तुरी राजमणीने महिलांच्या ६७ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवून कारकिर्दीतील मोठे यश संपादन केले.

बॅडमिंटनमध्ये सुहास एल. वाय., नवीन शिवकुमार आणि अभिजीत सखुजा यांनी पुरुष एकेरी एसएल४ प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचे किमान तीन पदके निश्चित झाली. कृष्णा नागर आणि शिवराजन सोळैमलाई यांनी पुरुष दुहेरी एसएच६ प्रकारात रौप्यपदक जिंकले.

ॲथलेटिक्समध्ये पदकांचा पाऊस

भारतीय ॲथलेटिक्स संघाने सहभागी असलेल्या ६२ प्रकारांपैकी ६० प्रकारांत पदक जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत ४१ पदकांची कमाई करणाऱ्या भारताला उर्वरित दोन दिवसांत ही कामगिरी साधण्याची संधी आहे.

पुरुषांच्या १०० मीटर टी४६/४७ संयुक्त प्रकारात दिलीप गावितने १०.६९ सेकंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले. मोहम्मद मोर्सिंगनाकथ बासिलने १०.७२ सेकंदांच्या स्पर्धा विक्रमी वेळेसह रौप्यपदक पटकावले. विविध अपंगत्व वर्गांतील खेळाडूंची संख्या पुरेशी राहावी म्हणून काही स्पर्धांमध्ये दोन किंवा अधिक वर्ग एकत्र केले जातात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

Mumbai : मेट्रो प्रकल्पांत ९ महिन्यांत ७ अपघात; MMRDA ला सुरक्षा अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश

जळगाव : गरबा खेळणाऱ्या महिलांवर हेडलाईट चमकवल्याच्या वादातून हत्या

Navi Mumbai : तलावात पैसे काढण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा मृत्यू

घुसखोराने वापरलेले दस्तऐवज सादर करा; मुंबई उच्च न्यायालयाचे आधार प्राधीकरणाला निर्देश