IND vs NZ ODI: भारतीय संघाचा मालिका विजय; न्यूझीलंडला २२ धावांनी नमवले; एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली 
क्रीडा

IND vs NZ ODI: भारतीय संघाचा मालिका विजय; न्यूझीलंडला २२ धावांनी नमवले; एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला.

Swapnil S

माउंट मौनगानुई : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-१ अशी जिंकली. यापूर्वी भारताने टी-२० मालिकाही ३-२ अशी खिशात घातली होती. विशेष म्हणजे, भारताने या विजयासह न्यूझीलंडची मायदेशातील सलग ११ मालिका विजयांची मालिका खंडित केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली. त्यानंतर अक्षर पटेलने ४६ धावा करत डावाला आकार दिला. इशान किशननेही आक्रमक फलंदाजी करत ४६ धावांचे योगदान दिले. मात्र, अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाचा डाव ४२.१ षटकांत २०९ धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंगला उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. कमी धावसंख्येचे आव्हान असतानाही गोलंदाजीतील शिस्त कायम ठेवल्यामुळे विजय मिळवता आला, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

संपूर्ण मालिका फलंदाजांसाठी आव्हानात्मक होती. बदलते हवामान, वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या आणि पावसाचे व्यत्यय अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. खेळाडूंनी कोणतीही सबब न देता सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर दिला.
श्रेयस अय्यर, कर्णधार

अर्शदीप-सिराजचा भेदक मारा

विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच धक्के दिले. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत यजमानांच्या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडले. अर्शदीपने ३० धावांत तीन, तर सिराजने ५० धावांत दोन बळी घेतले. न्यूझीलंडची अवस्था ४ बाद ८३ अशी झाली होती. त्यानंतर डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि मायकेल ब्रेसवेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडत सामन्यावरील पकड कायम ठेवली. फॉक्सक्रॉफ्टने सर्वाधिक ३१ धावा केल्या. अखेर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४८.१ षटकांत १८७ धावांवर बाद झाला.

धावफलक

  • भारत : २०९ धावा (४२.१ षटके)

  • अक्षर पटेल – ४६

  • इशान किशन – ४६

  • मिचेल सँटनर – ३/४७

  • जेकब डफी – ३/६०

  • न्यूझीलंड : १८७ धावा (४८.१ षटके)

  • डीन फॉक्सक्रॉफ्ट – ३१

  • अर्शदीप सिंग – ३/३०

  • मोहम्मद सिराज – २/५०

  • मालिका निकाल : भारताने ३-१ने जिंकली.

  • सामनावीर : अर्शदीप सिंग

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्र कायम अव्वल राहणार; MIDC चे सीईओ दीपेंद्र कुशवाह यांचे प्रतिपादन; एआय, डेटा सेंटर आणि उत्पादनांच्या क्षेत्रात प्रचंड संधी

अंतराळातून परतलेल्या 'स्टारशिप'ला झेलले

मृत्युदंड रद्द करण्यास भारताचा विरोध; संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाविरोधात मतदान

जीसीसी क्षेत्रात महाराष्ट्राची आगेकूच! तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादला मागे टाकण्याची तयारी

Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश