क्रीडा

फिरकीपटूंनी सामना फिरवला! चौथ्या कसोटीत भारताला विजयासाठी आणखी १५२ धावांची गरज

झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर कर्णधार रोहित शर्मा २४, तर सलामीवीर यशस्वी जैस्वाल १६ धावांवर नाबाद आहे.

Swapnil S

रांची : ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (५१ धावांत ५ बळी) आणि चायनामन कुलदीप यादव (२२ धावांत ४ बळी) या भारतीय फिरकीपटूंच्या जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची कोंडी केली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विजयाच्या दिशेने पाऊल टाकताना भारताने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ षटकांत बिनबाद ४० धावा केल्या आहेत. बेभरवशी खेळपट्टीवर भारताला विजयासाठी आणखी १५२ धावांची गरज असून त्यांचे सर्व फलंदाज शिल्लक असल्याने इंग्लंडवरील दडपण वाढले आहे.

झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर कर्णधार रोहित शर्मा २४, तर सलामीवीर यशस्वी जैस्वाल १६ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे सोमवारी पहिल्या दोन सत्रांमध्येच सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. ही कसोटी जिंकून भारताला मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेण्याची उत्तम संधी आहे. खेळपट्टीवर फिरकीपटूंना पुष्कळ मदत लाभत आहे. मात्र भारताचे फलंदाज त्यांना सर्मथपणे सामोरे जातील, अशी आशा आहे. एकवेळ सामन्यात फार पिछाडीवर असतानाही भारताने वर्चस्वाच्या दिशेने कूच करण्याचे मुख्य श्रेय हे फिरकीपटू तसेच २३ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांना जाते.

शनिवारच्या ७ बाद २१९ धावांवरून पुढे खेळताना भारतीय संघ १३४ धावांनी पिछाडीवर होता. मात्र जुरेल आणि कुलदीप या जोडीने पहिला एक तास सक्षमपणे खेळून काढला. कुलदीपने फलंदाजीतही योगदान देताना २ चौकारांसह १३१ चेंडूंत २८ धावा केल्या. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर तो दुर्दैवीरीत्या त्रिफळाचीत झाला. मात्र त्याने जुरेलसह आठव्या विकेटसाठी ७६ धावांची मोलाची भागीदारी रचली. दुसऱ्या बाजूने कारकीर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या जुरेलने पहिले अर्धशतक साकारले. १०व्या क्रमांकावरील आकाश दीपने जुरेलला उत्तम साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ५० धावांची भर घातली. शोएब बशीरने आकाशला (९) पायचीत पकडून कारकीर्दीत प्रथमच एका डावात पाच बळी मिळवले. मग जुरलने आक्रमण केले. अखेर ९० धावांवर असताना टॉम हार्टलीने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे भारताचा पहिला डाव १०३.२ षटकांत ३०७ धावांत संपुष्टात आला. जुरेलने ६ चौकार व ४ षटकार लगावताना १४९ चेंडू किल्ला लढवला. इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळवली.

दुसऱ्या सत्रात भारताने पहिल्या चेंडूपासूनच फिरकीपटूंद्वारे इंग्लंडवर आक्रमण केले. विशेषत: अनुभवी अश्विनने यावेळी पुढाकार घेत पाचव्या षटकात बेन डकेट (१५) व ओली पोप (०) यांना सलग चेंडूंवर बाद केले. त्यानंतर जो रूट व झॅक क्रॉली यांनी झटपट तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भर घातली. अश्विननेच रूटला (११) पायचीत पकडून भारताला तिसरे यश मिळवून दिले. क्रॉलीने मात्र ७ चौकारांसह मालिकेतील तिसरे अर्धशतक साकारले. क्रॉली व जॉनी बेअरस्टो यांच्या जोडीने ४५ धावांची भर घातल्यावर कुलदीप भारतासाठी धावून आला. त्याने प्रथम क्रॉलीचा (६०) मग कर्णधार बेन स्टोक्सचा (४) त्रिफळा उडवून चहापानाला इंग्लंडची स्थिती ५ बाद १२० अशी केली.

तिसऱ्या सत्रातील पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाने बेअरस्टोचा (३०) अडसर दूर केला. कुलदीपने मग हार्टली (७) व पहिल्या डावातील अर्धशतकवीर ओली रॉबिन्सन (०) यांना एकाच षटकात माघारी पाठवले. अखेर अश्विनने बेन फोक्स (१७) आणि अँडरसनला (०) ५४व्या षटकात बाद करून बळींचे पंचक पूर्ण केले. इंग्लंडचा दुसरा डाव ५३.५ षटकांत १४५ धावांतच आटोपला. त्यामुळे भारतापुढे विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. मात्र रोहित व यशस्वी यांनी उर्वरित ८ षटके बिनधास्त फलंदाजी करताना ४० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद ३५३

भारत (पहिला डाव) : १०३.२ षटकांत सर्व बाद ३०७ (ध्रुव जुरेल ९०, यशस्वी जैस्वाल ७३; शोएब बशीर ५/११९)

इंग्लंड (दुसरा डाव) : ५३.५ षटकांत सर्व बाद १४५ (झॅक क्रॉली ६०, जॉनी बेअरस्टो ३०; रविचंद्रन अश्विन ५/५१, कुलदीप यादव ४/२२)

भारत (दुसरा डाव) : ८ षटकांत बिनबाद ४० (रोहित शर्मा नाबाद २४, यशस्वी जैस्वाल नाबाद १६)

३५४ अश्विन हा भारतीय खेळपट्ट्यांवर कसोटी कारकीर्दीतील सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला. त्याने अनिल कुंबळेच्या ६२ कसोटींत ३५० बळींचा विक्रम मोडीत काढला. अश्विनच्या नावावर सध्या भारतातील ५९ कसोटींमध्ये ३५४ बळी जमा आहेत.

२७ मायदेशातील कसोटींमध्ये अश्विनने एकूण २७व्यांदा डावात पाच बळी पटकावले. या यादीत फक्त मुथय्या मुरलीधरन (४५) अश्विनपेक्षा पुढे आहे.

३५ अश्विनने कसोटी कारकीर्दीत तब्बल ३५व्यांदा डावात पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला. याबाबतीत त्याने अनिल कुंबळेची बरोबरी साधली. अश्विनच्या पुढे मुथय्या मुरलीधरन (६७), शेन वॉर्न (३७) आणि रिचर्ड हॅडली (३६) यांचा क्रमांक लागतो.

रोहितने कसोटी कारकीर्दीतील ४,००० धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा १७वा फलंदाज ठरला. ५८वी कसोटी खेळणाऱ्या रोहितच्या नावावर सध्या ४,००३ धावा जमा आहेत.

भारतीय खेळपट्ट्यांवर एकाही विदेशी संघाने चौथ्या डावात २००पेक्षा धावांचा बचाव केलेला नाही. ३२ कसोटींमध्ये २९ वेळा विदेशी संघाला पराभव पत्करावा लागला आहे, तर ३ वेळा लढत अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे इंग्लंडपुढे मोठे आव्हान असेल.

अखेरच्या कसोटीत श्विनकडे नेतृत्व सोपवावे!

३७ वर्षीय अश्विन सध्या कारकीर्दीतील ९९वा कसोटी सामना खेळत आहे. भारत-इंग्लंड यांच्यात ७ मार्चपासून धरमशाला येथे पाचवी कसोटी खेळवण्यात येईल. हा अश्विनच्या कारकीर्दीतील १००वा कसोटी सामना असेल. त्यामुळे या लढतीसाठी रोहितने अश्विनला नेतृत्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी केली आहे. “भारतीय संघ सोमवारी नक्कीच जिंकून मालिकेत आघाडी घेईल. पाचवी कसोटी अश्विनच्या कारकीर्दीतील १००वी कसोटी असेल. त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्या कसोटीत अश्विनला संघाचे नेतृत्व करू द्यावे,” असे गावसकर म्हणाले. अश्विनने मात्र यावर गावसकर यांचे आभार मानतानाच सध्या आपण फक्त खेळण्याचा आनंद लुटत आहोत, असे सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी