भारत-जपान पुरुष क्रिकेट संघात खास कारणास्तव मुकाबला (Photo-X)
क्रीडा

भारत-जपान पुरुष क्रिकेट संघात खास कारणास्तव मुकाबला

भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही देशांच्या पुरुष क्रिकेट संघांमध्ये २२ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळवला जाणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही देशांच्या पुरुष क्रिकेट संघांमध्ये २२ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळवला जाणार आहे. जपानमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला या सामन्याद्वारे मोलाचा सराव मिळणार आहे.

जपान क्रिकेट असोसिएशन (जेसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी संयुक्तपणे या सामन्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांच्या ७५व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाचा शुभारंभ म्हणून हा टी-२० सामना आयोजित केला जात असल्याचे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. जपानमधील टोचिगी प्रांतातील सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर दोन्ही संघ सुझुकी कपसाठी आमनेसामने येतील.

जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिखर परिषदेदरम्यान झालेल्या करारातून ‘स्पोर्ट ७५’ हा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमातील पहिले पाऊल म्हणून या सामन्याकडे पाहिले जात आहे. भारताच्या २०३६ मधील ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाच्या महत्त्वाकांक्षेची दखल घेत, भारत आणि जपानदरम्यान क्रीडा क्षेत्रातील मानवी देवाणघेवाण व सहकार्य वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दरम्यान, ही लढत आशियाई स्पर्धेचा भाग नसेल. भारतीय पुरुष संघ आशियाई स्पर्धेत थेट २८ सप्टेंबर रोजी उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे, तर महिला संघ १८ तारखेला जपानविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्यात आज पाहायला मिळणार दहीहंडीचा जल्लोष; थरावर थर आणि लाखांची बक्षिसे; मंडळांमध्ये मोठी चुरस

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Mumbai : ट्रिपल रायडिंगला 'ब्रेक'; ट्रकच्या टपावरून प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai : मुख्यालयासमोरच पालिकेचे नवे सभागृह; ३३२ नगरसेवकांची आसनव्यवस्था, ३० कोटींचा खर्च अपेक्षित

१० थरांसाठी गोविंदांची चुरस! मुंबई, ठाण्यातील दहीहंडीकडेही लक्ष