PTI, PCI_IN_Officia/ X
क्रीडा

Paralympic Games Paris 2024: अखेर बक्षिसांची रक्कम जाहीर!

पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक २९ पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंना अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून बक्षिसांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक २९ पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंना अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून बक्षिसांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मंडविया यांनी मंगळवारी याविषयी अधिकृत घोषणा केली. त्यानुसार पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तसेच रौप्यपदक मिळवणाऱ्यांना ५० लाख, तर कांस्यपदक विजेत्यांचा ३० लाख रुपये देऊन गौरव करण्यात येणार आहे.

पॅरिसमध्ये नुकताच पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण २९ पदकांची कमाई करून पदकतालिकेत १८वे स्थान मिळवले. चार वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. मात्र यंदा भारताने २९ पदकांना गवसणी घालून आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. मुख्य म्हणजे पॅरालिम्पिकपूर्वीच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून किमान १० पदकांची अपेक्षा होती. मात्र तेथे आपल्या खेळाडूंनी सपशेल निराशा केली.

त्यामुळे ऑलिम्पिकनंतर काही दिवसांतच सुरू झालेल्या पॅरालिम्पिकविषयी अनेकांना पुरेशी माहितीसुद्धा नव्हती. त्यात त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा बाळगणे तर दूरच. तसेच या स्पर्धेला भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपणही न लाभल्याने फक्त मोबाईलवरच चाहत्यांना सामन्यांचा आस्वाद लुटता आला. मात्र तमाम अडथळ्यांना समर्थपणे सामोरे जात भारताच्या पॅरा-खेळाडूंनी पॅरिसमध्ये तिरंगा फडकावला. स्पर्धा संपून दोन दिवस उलटले तरी अद्याप केंद्र शासनाने पॅरालिम्पिक विजेत्यांना रोख पारितोषिकसुद्धा जाहीर केलेले नव्हते. अखेर तिसऱ्या दिवशी का होईना, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे.

“यंदा पॅरालिम्पिकमध्ये आपल्या भारतीय खेळाडूंनी अलौकिक कामगिरी करताना २९ पदकांची लयलूट केली. पॅरा क्रीडाप्रकारात भारताची सातत्याने प्रगती होत असून या खेळाडूंना पूर्ण पाठबळ देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय प्रयत्नशील आहे. २०२८च्या पॅरालिम्पिकमध्ये आपल्या सुवर्णपदकांचा आकडा आणखी वाढलेला असेल,” असे क्रीडा मंत्री मंडविया म्हणाले.

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पॅरालिम्पिकपटूंचे धडाक्यात स्वागत झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मंडविया यांनी खेळाडूंचे कौतुक करतानाच बक्षिसांची रक्कम जाहीर केली. त्याशिवाय मिश्र सांघिक प्रकारात पदक मिळवणाऱ्यांना २२.५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल, असेही मंडविया यांनी जाहीर केले. त्यानुसार तिरंदाजीतील कांस्यपदक विजेत्या शीतल आणि राकेश यांना २२.५ लाख रुपये अतिरिक्त देण्यात येतील. मात्र भारतीय खेळाडूंसोबत गेलेल्या सहाय्यक चमू तसेच प्रशिक्षकांना कोणतेही पारितोषिक जाहीर करण्यात आलेले नाही, असे समजते.

पॅरालिम्पिकपटूंचे धडाक्यात स्वागत

पॅरिसमध्ये ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर मंगळवारी नवी दिल्ली येथे भारताच्या पॅरा खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाचा गरज करण्यासह यावेळी फुलांचा वर्षावही करण्यात आला. भालाफेकपटू सुमित अंटिल, तिरंदाज हरविंदर सिंग, तिरंदाज शीतल देवी यांसारख्या पदक विजेत्या खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. तसेच त्यांच्यासह सहाय्यक चमूचे सदस्यही होते.

भारताचे यंदाचे पदक विजेते

सुवर्ण (७) : अवनी लेखरा, नितेश कुमार, सुमित अंटिल, धरमबीर नैन, हरविंदर सिंग, नवदीप सिंग, प्रवीण कुमार.

रौप्य (९) : मनीष नरवाल, निशाद कुमार, योगेश कथुनिया, तुलसिमती मुरुगेसन, सुहास याथिराज, अजीत सिंग, शरद कुमार, सचिन खिलारी, प्रणव सूरमा.

कांस्य (१३) : मोना अगरवाल, प्रीती पाल, रुबिना फर्नांडिस, शीतल देवी, राकेश कुमार, निथ्या सिवन, मनीषा रामदास, दीप्ती जीवनजी, मरियप्पन थंगवेलू, सुंदर सिंग, कपिल परमार, होकाटो सेमा, सिमरन शर्मा.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या