ANI
क्रीडा

IND VS SA T20 WC26 Super 8: भारताची आज 'आफ्रिकन टेस्ट'! सुपर-८मधील पहिल्याच लढतीत अभिषेक शर्माच्या कामगिरीवर लक्ष

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सुपर-८ फेरीतील पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियासमोर आता आफ्रिकन सफारीचे आव्हान असणार आहे.

Swapnil S

अहमदाबाद : चारही सामने जिंकून अ गटावर पूर्णवणे वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाची आता टी-२० वर्ल्डकपच्या सुपर-८ फेरीत खरी परीक्षा असणार आहे. २०२४च्या टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत सात धावांनी विजय मिळवत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विश्वचषक उंचावला. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सुपर-८ फेरीतील पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियासमोर आता आफ्रिकन सफारीचे आव्हान असणार आहे.

भारताने चार सामन्यांत चार विजयांसह अ गटात अग्रस्थान प्राप्त केले. अमेरिकेला २९ धावांनी हरवल्यानंतर टीम इंडियाने नामिबियासारख्या दुबळ्या संघावर ९३ धावांनी विजय साकारला. पाकिस्तानला ६१ धावांनी धूळ चारल्यानंतर नेदरलँड्सचे आव्हानही भारताने १७ धावांनी परतवून लावले. त्याउलट दक्षिण आफ्रिकेने ड गटात चारही सामने जिंकून ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्यांनी कॅनडाला ५७धावांनी पराभूत केल्यावर अफगाणिस्तानवर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय प्राप्त केला. न्यूझीलंडला सहजपणे हरवत त्यांनी संयुक्त अरब अमिरातीवरही (यूएई) सरशी साधली. आता गटातील दोन अव्वल संघ आणि गेल्या टी-२० विश्वचषकातील फायनलमध्ये धडक मारणारे दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भारताने आफ्रिकेविरुद्ध सावधपणे फलंदाजी करण्याची रणनीती आखली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा तीन सामन्यांत शून्यावर बाद झाल्याने त्याच्या कामगिरीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्षष्ट संकेत कर्णधार सूर्यकुमार यादवने दिल्यामुळे संजू सॅमसनच्या खेळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन, केशव महाराज आणि आयडेन मार्करम अशी आफ्रिकेची भक्कम गोलंदाजी असल्यामुळे सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांना सावध फलंदाजी करण्यास सांगण्यात आले आहे.

दोन्ही संघ गेल्या दोन महिन्यांत सहाव्यांदा आमनेसामने येणार असल्यामुळे एकमेकांच्या ताकदीची दोघांनाही पूर्ण कल्पना आहे. तसेच आफ्रिकेचा गेला सामना अहमदाबादमध्येच झाला असल्याने येथील खेळपट्टीचीही त्यांना कल्पना आलेली आहे. इशान किशनने आतापर्यंत २०२च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत दोन अर्धशतकांसह भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली आहे. अभिषेक शर्मा फ्लॉप ठरत असताना सूर्यकुमार आणि तिलक वर्माने वेळोवेळी भारताची बाजू सावरली आहे. सूर्यकुमारचा अमेरिकेविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता (४९ चेंडूंत नाबाद ८४ धावा) त्यालाही अन्य सामन्यांत मोठी खेळी करता आलेली नाही. त्याउलट हार्दिक पंड्या (१५५चा स्ट्राइक रेड) आणि शिवम दुबे (१७८चा स्ट्राइक रेट) यांनी फिनिशरची भूमिका चांगल्याप्रकारे निभावली आहे.

भारताकडे आठ दमदार फलंदाज आहेत, मात्र त्यापैकी दोघांनाच आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी करावी लागणार आहे. खेळपट्टीकडून फलंदाजांना साथ मिळणार असल्यामुळे या सामन्यात २००पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. जसप्रीत बुमरा आणि वरुण चक्रवर्ती यांची गोलंदाजी चांगली होत असल्यामुळे भारताचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे. चक्रवर्तीने ४ सामन्यांत ९ विकेट्स मिळवले असून ५.१६च्या इकॉनॉमी रेटने त्याने धावा दिल्या आहेत. बुमराचा इकॉनॉमी रेट प्रतिषटकामागे ६ इतका आहे. मात्र क्विंटन डीकॉक, आयडेन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, त्रिस्तान स्टब्स, रायन रिकेलटन, डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सेन यांसारख्या तगड्या फलंदाजांवर वर्चस्व राखायचे असेल तर भारताला सांघिक कामगिरी उंचवावी लागणार आहे. आफ्रिकेने यान्सेन, एन्गिडी आणि महाराज यांना यूएईविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली होती, आता त्यांचे पुनरागमन निश्चित आहे.

खेळपट्टीत दडलंय काय?

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीची स्थिती फलंदाजांसाठी अगदी पोषक आहे. मनमोकळेपणाने फटकेबाजी करून धावा जमवता येतील, अशी ही खेळपट्टी आहे. सीमारेषा लांब असल्यामुळे फलंदाजांना दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला पुढे टोलवावे लागणार आहे. या सामन्यात गोलंदाजांवर दडपण असणार आहे. त्यामुळे अचूक टप्पा आणि दिशा राखूनच त्यांना गोलंदाजी करावी लागणार आहे. एखादा चेंडू सैल टाकल्यास, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३५ टी-२० सामने झाले असून त्यापैकी २१ लढती भारताने जिंकल्या असून आफ्रिकेला १३ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित सुटला आहे.

इशान किशनने जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली असून त्याला आता टी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकारांचा टप्पा पार पाडण्यासाठी फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे.

कुलदीप यादव याच्यावर भारताच्या फिरकी गोलंदाजीची प्रमुख धुरा असून त्याला टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचे शिखर गाठण्यासाठी अद्याप पाच विकेट्सची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका :

आयडेन मार्करम (कर्णधार), क्विंटन डीकॉक, रायन रिकेलटन, डेवाल्ड ब्रेविस, त्रिस्तान स्टब्स, डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, केशव महाराज, कॉर्बिन बॉश, आनरिख नॉर्किया, क्वेना मफाका, जॉर्ज लिंडे, जेसन स्मिथ.

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला

प्रवासी बस थेट नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी, नेपाळमध्ये भीषण अपघात, बचावकार्य सुरू

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे धोरणात्मक सुधारणा गरजेची; SBI रिसर्चची माहिती