क्रीडा

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारे भारतीय संघाचे शिलेदार बुधवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करतील. अ-गटात समावेश असलेल्या भारताची सलामीच्या लढतीत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईशी गाठ पडणार आहे.

Swapnil S

दुबई : मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारे भारतीय संघाचे शिलेदार बुधवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करतील. अ-गटात समावेश असलेल्या भारताची सलामीच्या लढतीत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईशी गाठ पडणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत मुंबईचेच विख्यात प्रशिक्षक लालचंद राजपूत यांच्या प्रशिक्षणात खेळणारा यूएईचा संघ भारताला धक्का देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगणार आहे. मंगळवारी अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग लढतीने या स्पर्धेला प्रारंभ झाला. आता बुधवारी भारताच्या सामन्याद्वारे स्पर्धेचा ज्वर खऱ्या अर्थाने वाढेल. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी संपली. त्यामुळे आता महिन्याभराच्या विश्रांतीनंतर सर्व खेळाडू ताजेतवाने होऊन मैदानात परतत आहेत.

भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी सर्व सामने अमिरातीतील दुबई व अबुधाबी येथे होतील. १९८४ पासून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत भारताचेच वर्चस्व दिसून आले आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक ८ वेळा ही स्पर्धा जिंकली असून श्रीलंका ६ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने दोन वेळा जेतेपद मिळवले आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा टी-२० स्वरूपात ही स्पर्धा होत आहे. त्यावेळी श्रीलंकेने जेतेपद पटकावले होते, तर २०२३मध्ये एकदिवसीय स्वरूपात झालेल्या आशिया चषकात भारताने बाजी मारली. २०१६ व २०२२ नंतर एकंदर तिसऱ्यांदा ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये होत आहे.

दरम्यान, भारतीय संघ फेब्रुवारीत शेवटचा टी-२० सामना खेळला आहे. इंग्लंडविरुद्धच्या त्या मालिकेत भारताने ४-१ असे यश संपादन केले होते. त्यानंतर आयपीएलमध्ये भारताचे खेळाडू विविध संघांकडून खेळले. आता थेट आशिया चषकाद्वारे पुन्हा एकदा भारत टी-२० प्रकाराकडे वळणार आहे. त्यामुळे दुबईतील खेळपट्टी व वातावरणाशी हा संघ कितपत लवकर जुळवून घेणार, हे पहावे लागेल.

दुसरीकडे, यूएईच्या संघाने बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र पाकिस्तान व अफगाणिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत त्यांना अपयश आले. यूएईचा कर्णधार मोहम्मद वासिमने या स्पर्धेत क्रमवारीतील वरच्या स्थानी असलेल्या संघांना धक्का देण्याची क्षमता असल्याचे आधीच जाहीर केले आहे. तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू व यूएईचे प्रशिक्षक राजपूत यांनी यूएईच्या खेळाडूंमध्ये मुंबईसारखी खडूस वृत्ती निर्माण केली असून ते नक्कीच आव्हान देतील, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे एकूणच टी-२० विश्वचषक विजेता भारत आणि यूएई यांच्यातील लढतीची सर्वांना उत्सुकता लागून आहे.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग.

  • यूएई : मोहम्मद वासिम (कर्णधार), मोहम्मद झोएब, आसिफ खान, अलिशान शरफू, राहुल चोप्रा, आर्यांश शर्मा, एथन डीसोझा, ध्रुव पारशर, साघिर खान, हैदर अली, सिमरनजीत सिंग, मतिउल्ला खान, मोहम्मद रोहिद, हर्षित कौशिक, मोहम्मद फारुक, जुनैद सिद्दीकी.

  • वेळ : रात्री ८ वाजता

  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, टेन ३ आणि सोनी लिव्ह ॲप

खेळपट्टी आणि वातावरण

दुबईत सायंकाळी होणाऱ्या टी-२० सामन्यांत दवाचा घटक नेहमीच निर्णायक ठरतो. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीत येथे भारताने फिरकीच्या बळावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे यावेळीही फिरकीपटूंना सहाय्य लाभेल. त्याशिवाय सपाट खेळपट्ट्यांवर धावांचा पाठलाग करणे सोपे जाईल. दुबईत यावेळी उष्णता मात्र मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही संघांतील खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागेल.

सूर्यकुमार-राजपूत यांचे कनेक्शन

सूर्यकुमार हा मुंबईसाठी देशांतर्गत हंगामात खेळतो. तसेच २०१८च्या टी-२० मुंबई लीगमध्ये सूर्यकुमार ट्रिम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ-ईस्ट या संघाचा कर्णधार होता. त्यावेळी राजपूतच त्या संघाचे प्रशिक्षक होते. त्यामुळे या दोघांनी एकत्रित भरपूर वेळा काम केले आहे. २००७मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला, तेव्हा राजपूत हे भारतीय संघाचे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मुंबईकडूनच एकेकाळी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या राजपूत यांनी अफगाणिस्तान, झिम्बाब्वे या संघांचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. त्यामुळे ते आता यूएईला कितपत प्रगतीच्या दिशेने नेणार, याकडे लक्ष असेल.

गिलवर लक्ष, बुमरावर भिस्त

जवळपास वर्षभराने भारताच्या टी-२० संघात परतणाऱ्या उपकर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीवर या संपूर्ण स्पर्धेत लक्ष असेल. तसेच गिल सलामीला येणार असल्यास तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन किंवा तिलक वर्मा यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल. श्रेयस अय्यर व यशस्वी जैस्वाल यांना आशिया चषकासाठी वगळून गिलला प्राधान्य दिल्याने अनेकांनी टीका केली होती. चौथ्या ते सहाव्या स्थानी सूर्यकुमार, हार्दिक पंड्या व अक्षर पटेल यांचे स्थान पक्के मानले जात आहे. जर सॅमसनला स्थान लाभले नाही, तर यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माला संधी दिली जाईल. गोलंदाजीत मात्र पुन्हा एकदा तारांकित जसप्रीत बुमरावर भारताची भिस्त असेल. २०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यानंतर बुमरा पुन्हा एकदा या प्रकारात भारतीय संघात परतला आहे. कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती या फिरकी जोडीकडून दुबईत वर्चस्व अपेक्षित आहे. दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग किंवा हर्षित राणा यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.

भारत-यूएई यांच्यात आतापर्यंत फक्त एकच टी-२० सामना झाला आहे. २०१६च्या आशिया चषकात झालेल्या त्या लढतीत भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. तसेच एकदिवसीय प्रकारात भारताने यूएईला तिन्ही सामन्यांत धूळ चारली आहे.

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी

गर्भधारणा रोखणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या गोपनीयतेचे रक्षण करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश