हरारे : १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. वैभवने १९ चेंडूंत साकारलेल्या ५० धावांच्या खेळीमुळे भारताने पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ७ गडी व ४० चेंडू राखून धुव्वा उडवला.
भारताने तब्बल ४ महिन्यांनी एखादी टी-२० लढत जिंकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी मार्च महिन्यात भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला धूळ चारली होती. तसेच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सलग सहा पराभवानंतर भारताचा हा पहिलाच विजय ठरला. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला एकही विजय मिळवता आलेला नव्हता. वेगवान गोलंदाज मयांक यादव (१८ धावांत २ बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासह भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना शनिवारी खेळवण्यात येईल.
हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मयांकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन करत झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखले. ऑक्टोबर २०२४ नंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या मयांकने पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला यष्टीरक्षककडे झेलबाद केले. पंचांनी बाद दिले नव्हते, परंतु भारताने डीआरएसचा यशस्वी वापर केला. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या मयांकने १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत २ बळी घेतले. तसेच पदार्पण करणाऱ्या अशोक शर्माने सुरुवातीला धावा दिल्यानंतर पुनरागमन केले, तर रवी बिश्नोईने २४ धावांत १ बळी घेतला. झिम्बाब्वेकडून वेस्ली मधेवेरे याने ३८, तादिवानाशे मरुमनी याने नाबाद २७ आणि रायन बर्ल याने २६ धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझा ३२ धावांवर ४ बाद असताना बाद झाला.
१२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (१) स्वस्तात बाद झाला. मात्र, फेब्रुवारीत याच मैदानावर १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत १७५ धावा करणाऱ्या वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने १९ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावा केल्या. १८ चेंडूंत त्याने अर्धशतकाची वेस ओलांडली. रिचर्ड नगारावाच्या दुसऱ्या षटकात त्याने दोन षटकार ठोकले, तर ब्लेसिंग मुझरबानीच्या गोलंदाजीवर ९० मीटर लांब षटकार मारला. पॉवरप्लेनंतर त्याने अर्धशतक पूर्ण केले. वैभवने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण केले. मात्र तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे १४, १३, १५ अशा धावा केल्या होत्या. अखेरीस गुरुवारी त्याची बॅट तळपली. वैभव बाद झाल्यानंतर ईशान किशन (३५) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद २८) यांनी १३.२ षटकांत संघाला विजय मिळवून दिला.
वैभव हा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अर्धशतक साकारणारा युवा खेळाडू ठरला. त्याचे हे कारकीर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. १५ वर्षे, ११८ दिवस इतके वय असलेल्या वैभवने जिब्राल्टरच्या लुईस ब्रूसचा (१६ वर्षे, ५६ दिवस) विक्रम मोडीत काढला.
भारताने सलग टी-२० सामने गमावल्यानंतर अखेर विजय मिळवला. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन, तर इंग्लंडविरुद्ध भारताने चार असे एकूण सहा सामने गेल्या महिन्याभरात गमावले होते.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे : २० षटकांत ७ बाद १२५ (वेस्ले मधेवेरे ३९; मयांक यादव २/१८, प्रिन्स यादव २/१९) पराभूत वि.
भारत : १३.२ षटकांत ३ बाद १२६ (वैभव सूर्यवंशी ५०, इशान किशन ३५, श्रेयस अय्यर नाबाद २८)