आशियाई स्पर्धेसाठी पुन्हा निळ्या जर्सीला प्राधान्य; भगव्या रंगाचा वाद मिटला; हॉकी महासंघाचे अध्यक्ष तिर्की यांची माहिती x
क्रीडा

आशियाई स्पर्धेसाठी पुन्हा निळ्या जर्सीला प्राधान्य; भगव्या रंगाचा वाद मिटला; हॉकी महासंघाचे अध्यक्ष तिर्की यांची माहिती

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहेत. हॉकी जर्सीच्या रंगात अचानक बदल करून भगवा रंग लागू करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. तीव्र वादानंतर भारतीय हॉकी महासंघाने (हॉकी इंडिया) पुन्हा जुना निळा रंग बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहेत. हॉकी जर्सीच्या रंगात अचानक बदल करून भगवा रंग लागू करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. तीव्र वादानंतर भारतीय हॉकी महासंघाने (हॉकी इंडिया) पुन्हा जुना निळा रंग बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी स्वत: याविषयी माहिती दिली.

नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे ऑगस्ट महिन्यात एफआयएच विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग निळ्यावरून भगवा करण्यात आला होता. या निर्णयावरून क्रीडा वर्तुळात तसेच राजकीय क्षेत्रातही तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवर थेट निशाणा साधला होता. याशिवाय, माजी कर्णधार वीरेन रस्किन्हा, परगट सिंग, धनराज पिल्ले आणि अजितपाल सिंग यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनीही जर्सीचा रंग बदलण्याच्या निर्णयावर सार्वजनिकरीत्या प्रश्न उपस्थित केले होते. निळ्या रंगाच्या टर्फवर निळ्या जर्सीत खेळताना खेळाडूंना दृश्यमानतेचा त्रास होतो, असा तर्क रंग बदलामागे देण्यात आला होता.

जर्सी बदलावरून निर्माण झालेला वाद अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या विधानामुळे अधिकच वाढला होता. निवडून आलेले नेतृत्व आणि कार्यकारी मंडळाला अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप तिर्की यांनी केला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत जाणाऱ्या भारतीय पथकाच्या निरोप समारंभादरम्यान तिर्की यांनी यावर स्पष्टीकरण दिले. “भारतीय ऑलिम्पिक संघटनाने (आयओए) किटच्या रंगांबाबत दिलेले पर्याय पाहता हॉकी इंडियाने निळ्या रंगाची पहिली पसंती म्हणून निवड केली असून नारंगी रंग हा दुसरा पर्याय असेल. विश्वचषकापूर्वीच भगवी जर्सी कायमस्वरूपी नसून भविष्यात बदलली जाऊ शकते, असे सांगितले होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत संघ निळ्या जर्सीमध्येच खेळेल,” असे तिर्की यांनी स्पष्ट केले.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची कामगिरी निराशाजनक झाली असून संघ आठव्या स्थानावर फेकला गेला होता. दुसरीकडे, महिला संघाने १९७४ नंतरची आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत पाचवे स्थान पटकावले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून आगामी २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे थेट तिकीट मिळवण्याची आणि आशियाई स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी संधी भारतीय संघांना मिळणार आहे.

भारताचे दोन्ही संघ जपानला रवाना

विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी विसरून, भारतीय हॉकी संघांनी आपल्या त्रुटी शोधून त्या सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी दिला आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेद्वारे २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे थेट पात्रता तिकीट मिळवणे हेच भारतीय हॉकी संघांचे प्रमुख ध्येय असायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. क्रीडामंत्र्यांनी सोमवारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) मुख्यालयात सुमारे एक तास चाललेल्या विशेष बैठकीत दोन्ही हॉकी संघांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीला पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन, कर्णधार हरमनप्रीत सिंग, महिला संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरीन, कर्णधार सलिमा टेटे यांच्यासह हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की, सरचिटणीस भोलानाथ सिंग, क्रीडा सचिव हरी रंजन राव, टॉप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. जोहल आणि साइचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारताचे दोन्ही हॉकी संघ बैठकीपूर्वीच जपानला रवाना झाले होते.

मांडविया, उषा यांच्याकडून शुभेच्छा; भारताचे एकूण ५०३ खेळाडूंचे पथक

नवी दिल्ली : आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला न घाबरता दबावाचे रुपांतर उत्तम कामगिरीत करा, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी भारतीय खेळाडूंना केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची घोडदौड अशीच कायम ठेवावी, असेही ते म्हणाले.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे (आयओए) ५०३ सदस्यांच्या आशियाई क्रीडा पथकासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला आयओएच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्यासह विविध क्रीडा महासंघांचे अधिकारी उपस्थित होते. “२०१४च्या आशियाई स्पर्धेपासून २०२३च्या स्पर्धेपर्यंत भारताच्या पदकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. खेळाडूंचे यश हेच देशाचे यश असते. या आगामी स्पर्धेत भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील आणि क्रीडा क्षेत्रात मोठा बदल घडवून आणतील,” असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला.

२०१४मध्ये इनचॉन येथे भारताने ५७ पदके जिंकली होती, तर २०२३च्या हांगझोऊ स्पर्धेत भारताने १०७ पदके पटकावली. २०१४ ते २०२३ दरम्यान पदकांच्या संख्येत ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सुवर्णपदकांमध्ये ७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, २०२३ च्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताने १११ पदके जिंकली होती. महासंघ आणि शासन यांच्यातील सततच्या संवादामुळे क्रीडा क्षेत्रात हे सकारात्मक वातावरण आणि बदल घडल्याचे त्यांनी नमूद केले. भारतात प्रतिभेची किंवा मनुष्यबळाची कोणतीही कमी नाही. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांकडे भीती म्हणून न पाहता पदके जिंकण्याची संधी म्हणून पाहावे, असे मांडविया म्हणाले.

दरम्यान, हॉकी संघ आणि प्रमुख क्रीडापटूंसह अनेक दिग्गज खेळाडू आधीच स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्यामुळे किंवा अंतिम तयारीमध्ये व्यस्त असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले

Maratha Reservation : चर्चेची दारे बंद- राधाकृष्ण विखे-पाटील यांचे संकेत

PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड

मोहम्मद अली रोड अतिक्रमणमुक्त; फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, दुकाने, बांधकामांवर हातोडा; BMC च्या 'बी' वॉर्डात धडक कारवाई