नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा तमाम चाहत्यांना आहे. नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर शुक्रवारी भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघांतील पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. यंदाचे वर्ष हे टी-२० विश्वचषकाचे असल्याने या मालिकेचे महत्त्व वाढले आहे.
वानखेडेवरील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर एकदिवसीय मालिकेत भारताला ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. एलिसा हिलीच्या ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. आता टी-२०मध्येही त्यांचेच पारडे जड मानले जात आहे. गेल्या दोन टी-२० विश्वचषकात अनुक्रमे अंतिम व उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानेच भारताला नमवलेले आहे. त्याशिवाय एकंदर आकडेवारीसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे.
२०२२मध्ये उभय संघांत झालेल्या पाच लढतींच्या टी-२० मालिकेत भारताने एकमेव सामना सुपर-ओव्हरमध्ये जिंकला होता. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३१ टी-२० सामन्यांपैकी भारताने फक्त ७ लढती जिंकल्या असून या मालिकेत त्यांना एकंदर सांघिक कामगिरी उंचवावी लागणार आहे.
क्षेत्ररक्षण सुधारण्याचे आव्हान
एकदिवसीय मालिकेत भारतीय खेळाडूंनी एकूण ९ झेल सोडले. परिणामी ऑस्ट्रेलियाने तिन्ही लढतींमध्ये बाजी मारली. तसेच कर्णधार हरमनप्रीतचा खराब फॉर्म चिंतेचा विषय असून तिने एकदिवसीय मालिकेत फक्त १७ धावा केल्या. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीत पूजा वस्त्रकार, रेणुका शर्मा वेगवान माऱ्याची, तर दीप्ती शर्मा, साइका इशाक, श्रेयांका पाटील फिरकीची धुरा वाहतील.
लिचफील्ड, पेरी लयीत
ऑस्ट्रेलियाची २० वर्षीय सलामीवीर फोबे लिचफील्ड आणि अष्टपैलू एलिस पेरी या सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. पिलफील्डने एकदिवसीय मालिकेत एक शतक व दोन अर्धशतके झळकावली. तसेच मधल्या फळीत ताहिला मॅकग्रा, बेथ मूनी उत्तम योगदान देत आहेत. गोलंदाजीत ॲनाबेल सदरलँड व ॲश्लेघ गार्डनर यांच्यावर कांगारूंची प्रामुख्याने भिस्त आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, साइका इशाक, मन्नत कश्यप, तितास साधू, रेणुका सिंग ठाकूर, पूजा वस्त्रकार, कनिका अहुजा, मिन्नू मणी.
ऑस्ट्रेलिया : एलिसा हिली (कर्णधार), हीदर ग्रॅहम, डार्सी ब्राऊन, फोबे लिचफील्ड, ॲश्लेघ गार्डनर, किम गार्थ, जेस जोनासन, एलाना किंग, ताहिला मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगान शूट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, ग्रेस हॅरीस.
वेळ : सायं. ७ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप