वैभव सूर्यवंशी एक्स
क्रीडा

भारतीय युवा संघ नवव्यांदा अंतिम फेरीत; उपांत्य लढतीत श्रीलंकेचा धुव्वा; रविवारी जेतेपदासाठी बांगलादेशशी गाठ

१३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३६ चेंडूंत फटकावलेल्या ६७ धावांच्या बळावर भारतीय युवा संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची तब्बल नवव्यांदा अंतिम फेरी गाठली. भारताने उपांत्य लढतीत श्रीलंकेचा ७ गडी आणि १७० चेंडू राखून धुव्वा उडवला. आता रविवारी भारताची जेतेपदासाठी बांगलादेशशी गाठ पडेल. बांगलादेशने अन्य उपांत्य लढतीत पाकिस्तानला नमवले

Swapnil S

शारजा : १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३६ चेंडूंत फटकावलेल्या ६७ धावांच्या बळावर भारतीय युवा संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची तब्बल नवव्यांदा अंतिम फेरी गाठली. भारताने उपांत्य लढतीत श्रीलंकेचा ७ गडी आणि १७० चेंडू राखून धुव्वा उडवला. आता रविवारी भारताची जेतेपदासाठी बांगलादेशशी गाठ पडेल. बांगलादेशने अन्य उपांत्य लढतीत पाकिस्तानला नमवले.

शारजा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४६.२ षटकांत १७३ धावांत गारद झाला. शारुजन (४२) व लॅकविन अभयसिंगे (६९) यांनी चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचली. मात्र त्याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी निराशा केली. भारतासाठी चेतन शर्माने ३, तर किरण चोरमळे, आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आयपीएल लिलावातील सर्वात युवा खेळाडू ठरलेला डावखुरा वैभव आणि मुंबईचा १७ वर्षीय आयुष यांनी ५१ चेंडूंतच ९१ धावांची सलामी नोंदवली. आयुष ३४, तर आंद्रे सिद्धार्थ २२ धावांवर बाद झाला. मात्र वैभवने सलग दुसरे अर्धशतक साकारताना ६ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी केली. वैभव ६७ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार मोहम्मद अमान (नाबाद २५) आणि केपी कार्तिकेय (नाबाद ११) यांनी २१.४ षटकांत भारताचा विजय साकारला.

१९८९पासून सुरू झालेल्या युवा आशिया चषकाचे यंदा ११वे पर्व सुरू आहे. भारताने यापूर्वी आठ वेळा अंतिम फेरी गाठून प्रत्येक वेळेस विजेतेपद मिळवले. फक्त २०१७ व २०२३मध्ये भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. त्यामुळे यंदा भारताला पुन्हा जेतेपदाची उत्तम संधी आहे. रविवारी सकाळी १०.३० वाजता दुबईत अंतिम सामना खेळवण्यात येईल. दुसरीकडे बांगलादेशला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद खुणावत आहे. त्यांनी २०२३मध्ये अमिरातीला नमवून आशिया चषक उंचावला होता.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ४६.२ षटकांत सर्व बाद १७३ (लॅकविन अभयसिंगे ६९; चेतन शर्मा ३/३४, किरण चोरमळे २/३२) पराभूत वि.

भारत : २१.४ षटकांत ३ बाद १७५ (वैभव सूर्यवंशी ६७, आयुष म्हात्रे ३४, मोहम्मद अमान नाबाद २५; प्रवीण मनीषा १/२७)

सामनावीर : वैभव सूर्यवंशी

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार