क्रीडा

बॉर्डर-गावस्कर मालिकेत 'या' दोन खेळाडूंच्या कामगिरीवर भारताचे भवितव्य अवलंबून; इयान चॅपेल यांचे मत

२२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

Swapnil S

सिडनी : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची तंदुरुस्ती व लय आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेत भारतासाठी निर्णायक ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांनी व्यक्त केले. २२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियातील लागोपाठ दोन मालिका जिंकल्या आहेत. त्यांना ऑस्ट्रेलियातील मालिका विजयाची हॅट‌ट्रिक साधायची असेल, तर बुमरा आणि पंत यांनी तंदुरुस्त राहणे, तसेच त्यांनी खेळातील लय कायम राखणे महत्त्वाचे असेल. “ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बहुचर्चित मालिकेसाठी अधिकाधिक खेळाडूंना तंदुरुस्त राखणे आणि त्यांच्या खेळात सातत्य ठेवणे भारतासाठी आवश्यक आहे. यामध्ये पंत आणि बुमरा हे दोन खेळाडू केंद्रबिंदू ठरतात. भीषण मोटर अपघातानंतर कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन करणे ही पंतसाठी उल्लेखनीय बाब आहे. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पंत यशस्वी ठरल्यास भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पुन्हा मालिका विजयासाठी मोठी संधी असेल,” असे मत चॅपेल यांनी मांडले आहे.

भारतासाठी बुमराचे महत्त्व विशद करताना चॅपेल म्हणाले, “ऑगस्ट २०२३मधील पाठीच्या दुखापतीनंतर पुनरागमन करताना बुमराने सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रारूपांत आपल्यावरील जबाबदारी चोख बजावली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळताना त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यात बुमराला मोहम्मद सिराजकडून सुरेख साथ मिळाली.”

पंतला रोखण्याचे आव्हान : कमिन्स

ऑस्ट्रेलियात झालेल्या गेल्या दोन बॉर्डर-गावस्कर मालिकांमध्ये पंतची कामगिरी निर्णायक ठरली आहे. त्यामुळे त्याला रोखण्याचे मुख्य आव्हान आमच्यापुढे असेल, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला. “पंत सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. भारतीय संघात निश्चित अनेक गुणवान खेळाडू आहेत. मात्र पंत फलंदाजी तसेच यष्टिरक्षणाद्वारे उल्लेखनीय योगदान देत आहे. गेल्या मालिकेतील आठवणी अद्याप ताज्या आहेत. त्यामुळे यावेळी पंतला रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो, तर मालिकाही आम्हीच जिंकू,” असे कमिन्सने सांगितले.

ओबामांनी 'मोठी चूक' केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप; UFO आणि एलियन्सशी संबंधित फाइल्स जाहीर करण्याचे दिले आदेश

Mumbai News : मुंबई लोकलमध्ये मोठा बदल! पहिली सलग १५ डब्यांची EMU लोकल सज्ज; एकाच फेरीत ७,५५५ प्रवाशांची क्षमता

जिमखान्याच्या मनमानीला बसणार चाप; धोरण बदलासाठी अभ्यासगटाची नेमणूक

Mumbai : आईने वाढवलेल्या मुलाला वडिलांचे नाव, जातीची सक्ती नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गैरवापर करणाऱ्यांना करा ‘खामोश’; शत्रुघ्न सिन्हा यांची उच्च न्यायालयात धाव