लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी चाहत्यांना मनोरंजनाच्या दुहेरी पर्वणीचा लाभ घेता येणार आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर शनिवारी दुपारी रंगणाऱ्या लढतीत धडाकेबाज फलंदाजांचे द्वंद्व क्रीडाप्रेमींना पाहता येईल. लखनऊ सुपर जायंट्सची गुजरात टायटन्सशी गाठ पडणार असून दोन्ही संघ विजयी कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असतील.
ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा संघ गुणतालिकेत सातत्याने ५ ते ७ क्रमांकात आढळत आहे. मात्र घरच्या मैदानात लखनऊला २ पैकी एकच लढत जिंकता आली आहे. त्यामुळे ते येथे कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील. लखनऊच्या संघात निकोलस पूरन, मिचेल मार्श अशा धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे. या सामन्याकडे दोन्ही संघांतील आघाडीच्या फलंदाजांवरच सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे प्रामुख्याने पूरन व मार्शच्या कामगिरीवर लखनऊचे भवितव्य अवलंबून असेल. पूरन सध्या २८८ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी आहे.
दुसरीकडे युवा शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणारा गुजरातचा संघ गुणतालिकेत तूर्तास अग्रस्थानी विराजमान आहे. पहिल्या लढतीत पराभूत झाल्यावर गुजरातने सलग चार सामने जिंकून अन्य संघांना इशारा दिला आहे. मुंबई, बंगळुरू, हैदराबाद व राजस्थान यांना गुजरातने हरवले. मुख्य म्हणजे चारपैकी २ सामने त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात जिंकले आहेत. त्यामुळे लखनऊच्या मैदानातही गुजरात छाप पाडू शकते. जोस बटलर या संघासाठी हुकमी एक्का असून डावखुरा सलामीवीर साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत २७३ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या दोघांना रोखण्याचे मुख्य आव्हान लखनऊपुढे असेल.
दरम्यान, लखनऊमध्ये यापूर्वीच्या दोन सामन्यांत १८० धावा सहज पार झाल्या. येथे दुपारच्या लढतीत धावांचा पाठलाग करणेही सोपे आहे. फिरकीपटूंना येथे सहाय्य मिळू शकते. नाणेफेक फारशी निर्णायक ठरणार नाही.
पंतला सूर गवसणार कधी?
गुजरातप्रमाणेच लखनऊलासुद्धा कर्णधाराच्या कामगिरीची चिंता सतावत आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू (२७ कोटी) ठरलेल्या पंतला आतापर्यंत ४ सामन्यांत फक्त १९ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे पहिल्या तीन फलंदाजांवर अतिरिक्त दडपण येत आहे. पूरन, मार्श व एडीन मार्करमशिवाय अब्दुल समद, आयुष बदोनी व डेव्हिड मिलर असे फलंदाजही लखनऊच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत मात्र हा संघ फक्त पाच गोलंदाजांसहच खेळत आहे. त्यात फिरकीपटू दिग्वेश राठी त्यांच्यासाठी सातत्याने छाप पाडत आहे. शार्दूल ठाकूर, आवेश खान व आकाश दीप यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त आहे. लेगस्पिनर रवी बिश्नोई काहीसा महागडा ठरत आहे.
गिलच्या कामगिरीची गुजरातला चिंता
गिलची बॅट या आयपीएलमध्ये अद्याप तळपलेली नाही. ५ सामन्यांत १ अर्धशतकासह त्याने फक्त १४८ धावा केल्या आहेत. त्यामुळे गिलकडून गुजरातच्या चाहत्यांना दमदार खेळी अपेक्षित आहे. बटलर व सुदर्शन फॉर्मात आहेतच. शर्फेन रुदरफोर्ड व शाहरूख खानही फटकेबाजी करत आहेत. वॉशिंग्टन सुंदर व ग्लेन फिलिप्स यांसारख्या खेळाडूंना गुजरातच्या संघात स्थान मिळत नाही, हे खरंच आश्चर्यजनक आहे. मात्र तूर्तास गुजरातला याचा फटका बसलेला नाही. गोलंदाजीत कगिसो रबाडाच्या अनुपस्थितीतही भारताच्या वेगवान शिलेदारांनी धुरा योग्यपणे वाहली आहे. मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, इशांत शर्मा व कुलवंत खेजरोलिया असे वेगवान पर्याय त्यांच्याकडे आहेत. फिरकीपटू रशिद खान व साईकिशोर मधल्या षटकांत प्रभावी कामगिरी करत आहेत.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी गुजरातने ४, तर लखनऊने फक्त १ लढत जिंकली आहे. त्यामुळे आकडेवारी गुजरातच्या बाजूने आहे. गतवर्षी मात्र लखनऊने गुजरातला इकाना स्टेडियमवरच एकमेव लढतीत धूळ चारली होती.
प्रतिस्पर्धी संघ
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, ग्लेन फिलिप्स, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर.
वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप