अहमदाबाद : चेन्नईचा ४३ वर्षीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुढील वर्षीही आयपीएल खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. चेन्नईचा यंदाचा हंगाम संपला असून इतिहासात प्रथमच ते आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी राहिले. धोनीने सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये निवृत्तीविषयी भाष्य केले.
“माझ्याकडे अजूनही पुरेसा वेळ आहे. फक्त सुमार कामगिरी झाली म्हणून खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला, तर काही खेळाडू वयाच्या २२व्या वर्षीच निवृत्त झाले असते. मी असे म्हणणार नाही, की मी थांबत आहे. मी असेही म्हणणार नाही की मी पुन्हा येणार नाही. तूर्तास मी रांचीत जाऊन बाईकस्वारीचा आनंद लुटणार आहे,” असे धोनी म्हणाला. त्यामुळे धोनी पुढील वर्षीही आयपीएल खेळण्याची दाट शक्यता बळावली आहे.
ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार होता. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर गेल्यावर धोनीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र तरीही चेन्नईचे नशीब पालटले नाही. धोनीच्या वक्तव्यानंतर समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.