फोटो सौजन्य - एक्स
क्रीडा

IPL 2025, RR Vs PBKS : पंजाबचे लक्ष प्ले-ऑफ फेरीकडे; राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज लढत

पंजाब किंग्स इलेव्हनने सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असली तरी रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून प्ले-ऑफ फेरीचे तिकीट निश्चित करण्याकडे त्यांचे लक्ष असेल.

Swapnil S

जयपूर : पंजाब किंग्स इलेव्हनने सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असली तरी रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून प्ले-ऑफ फेरीचे तिकीट निश्चित करण्याकडे त्यांचे लक्ष असेल. राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या मोसमात मात्र चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

सवाई मानसिंग स्टेडियमवर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर रंगणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यानंतर ८ मे रोजी पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील धरमशाला येथील सामना तडकाफडकी रद्द करण्यात आला होता. त्या कटू स्मृती बाजूला सारून अय्यरचा संघ आता पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

पंजाब किंग्स इलेव्हन सध्या ११ सामन्यांत १५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉइनिस आणि जोश इंग्लिस यांनी पंजाब संघात पुन्हा एकदा सामील होण्यास सहमती दर्शवल्यानंतर त्यांची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन याला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने माघारी बोलावले आहे. प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह आणि नेहाल वधेरा यांसारखी तगडी सलामीची फळी पंजाबकडे आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू यजुवेंद्र चहल हे चांगली कामगिरी करत आहेत. जायबंदी लॉकी फर्ग्युसनच्या जागी पंजाब संघात न्यूझीलंडच्या कायले जेमिसन याची इंट्री झाली असली तरी त्यांचा संघ अजूनही फलंदाजांच्या कामगिरीवरच अवलंबून आहे.

राजस्थान रॉयल्सचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला असून त्यांना यंदा १२ सामन्यांत फक्त ६ गुणांचीच कमाई करता आली आहे. १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूंत फटकावलेले शतक हीच त्यांची पुण्याई म्हणता येईल. यंदाच्या मोसमात राजस्थानला कर्णधार संजू सॅमसनची उणीव प्रकर्षाने जाणवली. यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असली तरी त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी होताना दिसत नाही.

प्रतिस्पर्धी संघ

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव

जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन

सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

'लाडकी बहीण' योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट ; महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत होणार कारवाई

MMRDA ला अखेर जाग; मोनोरेलची प्रवासीक्षमता निश्चित; गाड्यांची तपासणी होणार

MIDC मधील झोपड्या ४ महिन्यांत हटवा; मुंबई उच्च न्यायालयाचे नवी मुंबई पालिकेला आदेश

Mumbai : पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद; जैन समाजाची मागणी BMC कडून मान्य

विम्याचा हप्ता होणार कमी; आरोग्य-जीवनविम्याला GST तून वगळणार?