मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा उर्वरित १८वा हंगाम शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र आता स्पर्धेची अंतिम फेरी एका आठवड्याने लांबणीवर गेल्याने अनेक विदेशी खेळाडू निर्णायक क्षणी आपापल्या संघांना सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यामुळे आयपीएलमधील काही संघांनी पर्यायी खेळाडूंचा शोध घेण्यास सुरू केला आहे, तर काहीजण आपल्या परदेशी खेळाडूंना स्पर्धा सोडून माघारी न परतण्यासाठी विनवणी करतानाही दिसतील. एकूणच सध्या भारतीयांच्या तुलनेत परदेशी खेळाडूच जास्त भाव खात आहेत.
२२ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १८वा हंगाम ७ मेपर्यंत उत्तमरित्या सुरू होता. मात्र ८ मे रोजी दिल्ली-पंजाब यांच्यातील ५८वा सामना मध्यातच थांबवण्यात आला. पंजाब तसेच जम्मू-कश्मीर येथे पाकिस्तानने ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांमुळे ही लढत मध्यातच स्थगित करण्यात आली. धरमशाला येथे संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आल्याने स्टेडियमचे प्रकाश पुरवणारे टॉवर अचानक बंद झाले. हळूहळू चारही टॉवर बंद झाल्यावर प्रेक्षकांना स्टेडियम सोडून जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुढच्याच दिवशी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती.
मात्र १२ मे रोजी एकीकडे विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केलेली असतानाच रात्री १०च्या सुमारास बीसीसीआयने आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता १७ मे ते ३ जून या कालावधीत उरलेले १७ सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताचे सर्व खेळाडू उपलब्ध असले तरी विदेशी खेळाडू आपापल्या देशात परतले होते. पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे २५ मे रोजी आयपीएल संपणे अपेक्षित होते. मात्र आता सर्व वेळापत्रक बदलल्याने विदेशी खेळाडूंची पंचायत होणार आहे. एकीकडे वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या संघांत २९ मेपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. तर दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपदचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे बहुतांश विदेशी खेळाडू साखळी फेरी पूर्ण होण्यापूर्वीच १-२ सामने खेळून आपल्या देशात परततील.
दक्षिण आफ्रिकन बोर्डाने आपापल्या खेळाडूंना २६ मेपर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय इंग्लंडचे खेळाडूही २७ मेपर्यंत त्यांच्या देशात जातील. ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू अद्याप भारतातच परतलेले नाहीत. त्यामुळे ते थेट आफ्रिकेविरुद्धच्या लढतीसाठी तयारी करतील, असे समजते. अशा स्थितीत अनेक संघांनी पर्यायी खेळाडूंचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तर काहींना मात्र लिलावात घेतलेल्या खेळाडूंपैकीच एकाला संधी द्यावी लागेल.
कोणते विदेशी खेळाडू स्पर्धा सोडून जाणार?
११ जूनपासून आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्स येथे जागतिक कसोटीचा अंतिम सामना रंगेल. या लढतीसाठी आफ्रिकेच्या संघातील एडीन मार्करम (लखनऊ), रायन रिकल्टन, कॉर्बिन बोश (मुंबई), लुंगी एन्गिडी (बंगळुरू), मार्को यान्सेन (पंजाब), कगिसो रबाडा (गुजरात), ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली) हे खेळाडू २६ मे रोजी त्यांच्या देशात परततील. त्यामुळे त्या-त्या संघांना पर्यायी खेळाडू निवडता येतील.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड (बंगळुरू) जायबंदी असल्याने तो भारतात येणार नाही. तर, मिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स) नेही भारतात परतणार नसल्याचे म्हटले आहे. विल जॅक्स (मुंबई), जोस बटलर (गुजरात) हे इंग्लंडचे खेळाडू विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी माघारी परततील. तसेच रोमारिओ शेफर्ड (बंगळुरू) विंडीजला दाखल होईल.
पर्यायी खेळाडू घेण्याची परवानगी
बीसीसीआयने माघारी परतलेल्या खेळाडूंच्या जागी तात्पुरता पर्यायी विदेशी खेळाडूंची निवड करण्याची मुभा दिली आहे. मात्र हे पर्यायी खेळाडू संघांना पुढील वर्षी कायम ठेवता येणार नाही. ते पुन्हा लिलावात दाखल होतील.
सध्या प्रत्येक संघाने आपापल्या शहरात सरावाला प्रारंभ केला आहे. चेन्नई, कोलकाता, पंजाब येथील शहरांत आयपीएलचा एकही सामना आयोजित नाही. तसेच स्पर्धेतील बाद फेरीचे सामने मुंबई आणि अहमदाबाद येथे होणार असल्याचे समजते. याविषयी लवकरच बीसीसीआय अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.