भारतीय टी-२० संघातून सूर्यकुमारला डच्चू? २०२८ च्या वर्ल्ड कपसाठी निवड समितीची नवी रणनीती; सूर्याचे वय आणि ढासळता फॉर्म ठरतेय चिंतेचा विषय संग्रहित छायाचित्र - FPJ
क्रीडा

भारतीय टी-२० संघातून सूर्यकुमारला डच्चू? २०२८ च्या वर्ल्ड कपसाठी निवड समितीची नवी रणनीती; सूर्याचे वय आणि ढासळता फॉर्म ठरतेय चिंतेचा विषय

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारताने या वर्षी टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद राखले असले, तरी आता त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.

Swapnil S

गुवाहाटी : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारताने या वर्षी टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद राखले असले, तरी आता त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वरिष्ठ निवड समिती सूर्यकुमारच्या टी-२० संघातील भवितव्यावर चर्चा करणार आहे.

प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, १९ मे रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत भारतीय टी-२० संघाच्या आगामी नियोजनाबाबत अनौपचारिक चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक अधिकृतपणे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ निवडण्यासाठी बोलावण्यात आली आहे, परंतु यामध्ये आयर्लंड आणि इंग्लंडच्या आगामी टी-२० दौऱ्यांबाबतही चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावल्यानंतर निवड समितीची ही पहिलीच प्रत्यक्ष बैठक होणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२६ च्या वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. मात्र, आता निवड समिती २०२८ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघाची बांधणी करत आहे.

कामगिरीतील घसरण चिंतेची बाब

सूर्यकुमारने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली असली, तरी फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीत झालेली घसरण चिंतेचा विषय ठरली आहे. २०२४ च्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमारची सरासरी आणि स्ट्राईक रेट यामध्ये मोठी घसरण झाली आहे. वर्ल्डकप मोहिमेतही अमेरिकेविरुद्धची एक खेळी वगळता त्याला मोठी कामगिरी करता आली नव्हती. वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १८, ११ आणि शून्य धावा केल्या होत्या.

आयपीएलमधील कामगिरीही सुमार

आयपीएल २०२६ मधील सूर्यकुमारची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये अवघ्या १७.७३ च्या सरासरीने आणि १४४.४४ च्या स्ट्राईक रेटने १९५ धावा केल्या आहेत. गोलंदाज आता त्याच्याविरुद्ध शरीराजवळ शॉर्ट पिच चेंडू टाकून त्याला अडचणीत आणत आहेत. सूर्यकुमार या सप्टेंबर महिन्यात ३६ वर्षांचा होणार आहे, तर पुढील टी-२० वर्ल्डकप दोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. तिथे सलग तिसरे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने उतरणाऱ्या भारतीय संघाला आता दीर्घकालीन विचार करावा लागणार असल्याने निवड समिती सूर्यकुमारच्या जागी नव्या पर्यायांचा विचार करू शकते.

Weather Update : अर्ध्या देशात पुढील ६ दिवस उष्णतेची लाट

अणुऊर्जा प्रकल्पांचा धमाका; २५ हजार ४०० मेगावॉट क्षमता, १ लाख २३ हजारांना रोजगार

पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर ९० पैशांची वाढ; पाच दिवसांतील दुसरी दरवाढ

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरात ED च्या ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला

NEET पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत, मोटेगावकर पुत्रही ताब्यात; मास्टरमाइंडने एक हजार विद्यार्थ्यांना पेपर विकल्याचा संशय