लाहोर : अनुभवी केन विल्यम्सनने (११३ चेंडूंत नाबाद १३३ धावा) सोमवारी एकदिवसीय कारकीर्दीतील १४वे शतक साकारले. त्यामुळे न्यूझीलंडने तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठताना दक्षिण आफ्रिकेला ६ गडी आणि ८ चेंडू राखून धूळ चारली.
पाकिस्तान, आफ्रिका आणि न्यूझीलंड या तीन देशांमध्ये ही तिरंगी मालिका पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येत आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने तिन्ही संघांचा यानिमित्ताने सराव होत आहे. न्यूझीलंडने मात्र सलग दोन लढती जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी त्यांनी पाकिस्तानला ७८ धावांनी नमवले. त्यामुळे आता बुधवारी पाकिस्तान व आफ्रिका यांच्यात होणाऱ्या अखेरच्या लढतीतील विजेता अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी दोन हात करेल.
दरम्यान, सोमवारी प्रथम फलंदाजी करताना पदार्पणवीर मॅथ्यू ब्रीट्झकेने १४८ चेंडूंत १५० धावांची खेळी साकारली. त्यामुळे आफ्रिकेने ५० षटकांत ६ बाद ३०४ धावांपर्यंत मजल मारली. त्याला कायले वेरानची (६४) उत्तम साथ लाभली. मात्र विल्यम्सन व डेवॉन कॉन्वे (९७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १८७ धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडचा विजय साकारला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ६ बाद ३०४ (मॅथ्यू ब्रीट्झके १५०, कायले वेरान ६४; मॅट हेन्री २/५९) पराभूत वि. न्यूझीलंड : ४८.४ षटकांत ४ बाद ३०८ (केन विल्यम्सन नाबाद १३३, डेवॉन कॉन्वे ९७)