क्रीडा

KKR vs RR : कोलकाताचा रोमहर्षक विजय; राजस्थानवर एका धावेने मात; रियानची झुंजार खेळी व्यर्थ

आंद्रे रसेलचा फॉर्म परतला असून त्याच्या वादळी अर्धशतकामुळे कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला.

Swapnil S

कोलकाता : आंद्रे रसेलचा फॉर्म परतला असून त्याच्या वादळी अर्धशतकामुळे कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला. रविवारी झालेल्या या लढतीतील विजयामुळे गतविजेत्या कोलकाताने यंदाच्या हंगामातील ‘प्ले ऑफ’ प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

यंदाच्या हंगामात रसेलचा फॉर्म खराब होता. मात्र राजस्थानविरुद्धच्या लढतीत त्याची बॅट चांगलीच चालली. त्याने २५ चेंडूंत नाबाद ५७ धावा चोपल्या. रसेलच्या फटकेबाजीमुळे कोलकाताने शेवटच्या ५ षटकांत ८५ धावा चोपत निर्धारित २० षटकांत ४ फलंदाज गमावून २०६ धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला आलेल्या राजस्थानचा संघ ८ षटकांत ७१/५ अशा अडचणीत सापडला. त्यांना विजयासाठी ४८ चेंडूंत १०५ धावांची आवश्यकता होती. कर्णधार रियान परागने ६ चौकार आणि ८ षटकारांच्या बळावर ४५ चेंडूंत ९५ धावा फटकावत संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

रियानला आयपीएलमधील त्याच्या पहिल्या शतकासाठी केवळ ५ धावांची आवश्यकता असताना कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने गोलंदाजीत योग्य बदल केला. तोच खरे तर निर्णायक ठरला. वैभव अरोराने अखेरच्या षटकात दबाव असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत राजस्थानला २०५/८ असे रोखले.

रॉयल्सला अखेरच्या षटकात विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. इम्पॅक्ट खेळाडू शुभम दुबेने अरोराला २ षटकार आणि एक चौकार लगावत सामन्यात रंगत आणली. अखेरच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती. रहाणेने शानदार क्षेत्ररक्षण सजवले. त्याने निर्णायक चेंडूवर रिंकू सिंगला लाँग ऑफला क्षेत्ररक्षणासाठी पाठवले. त्याने अप्रतिम थ्रो मारत अरोराकडे चेंडू फेकला. अरोराने नॉन स्ट्रायकर जोफ्रा आर्चरला बाद करत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, आता कोलकाताच्या खात्यात ११ गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ‘प्ले ऑफ’चे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित तिन्ही सामन्यांत विजय आवश्यक आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने निराशाजनक सुरुवात केली. वैभव सूर्यवंशी (४ धावा) पहिल्याच षटकात माघारी परतला. कुणाल सिंह राठोडला भोपळाही फोडता आला नाही. २ षटकांनंतर रॉयल्सने ८ धावा करून २ विकेट गमावल्या होत्या.

त्यानंतर परागने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. तर यशस्वी जयस्वालने (२१ चेंडूंत ३४ धावा) वरुण चक्रवर्तीला लागोपाठ चौकार लगावले. या दुकलीने फटकेबाजी करत ‘पॉवर प्ले’मध्ये संघाची धावगती वाढवली.

दरम्यान हर्षित राणाने २ षटकांत २८ धावा मोजल्या होत्या आणि अरोराही महागडा ठरला होता. त्यावेळी कोलकाताने फिरकीपटू मोईन अली आणि चक्रवर्तीकडे चेंडू सोपवला. या दुकलीने सामन्याला वळण दिले. दोघांनी मिळून ४ फलंदाजांना माघारी धाडत ७१ धावांवर ५ फलंदाज बाद अशा अडचणीत रॉयल्सला टाकले. मोईनने जयस्वालला बाद करत राजस्थानची लय तोडली.

आंद्रे रसेलच्या फटकेबाजीमुळे कोलकाताने शेवटच्या ७ षटकांत ९५ धावा चोपल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रसेलने २५ चेंडूंत नाबाद ५७ धावा फटकवल्या. रसेलने आपल्या खेळीची सुरुवात शांत केली. मात्र वेगवान गोलंदाजांवर त्याने जोरदार हल्ला चढवला.

१८ व्या षटकात रसेलने थिक्षणाच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार लगावले. अखेरच्या षटकांत संघाची धावगती वाढवण्यात रसेलचा मोलाचा वाटा होता. कोलकाताने २० षटकांत २०६ धावा केल्या.

रियान परागचे सलग ६ षटकार

राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सलग सहा षटकार ठोकले. ही कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पहिला फलंदाज ठरला. १३व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने एक धाव घेऊन रियान परागला स्ट्राइक दिली. परागने पुढील चार चेंडूंवर सलग षटकार ठोकले. मोईनने पुढचा चेंडू वाइड टाकला. मात्र, त्यानंतर अखेरच्या चेंडूवर परागने षटकार ठोकला. पुढील षटकात, हेटमायरने पुन्हा पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि परागला स्ट्राइक दिली. यावेळी त्याने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप करत षटकार ठोकत सलग सहा षटकारांचा पराक्रम केला.

आंद्रे रसेलच्या फटकेबाजीमुळे कोलकाताने शेवटच्या ७ षटकांत ९५ धावा चोपल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रसेलने २५ चेंडूंत नाबाद ५७ धावा फटकवल्या. रसेलने आपल्या खेळीची सुरुवात शांत केली. मात्र वेगवान गोलंदाजांवर त्याने जोरदार हल्ला चढवला.

१८ व्या षटकात रसेलने थिक्षणाच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार लगावले. अखेरच्या षटकांत संघाची धावगती वाढवण्यात रसेलचा मोलाचा वाटा होता. कोलकाताने २० षटकांत २०६ धावा केल्या.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत