क्रीडा

राहुल सलामीला, तर पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार! भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केलचे संकेत; गिलविषयी संभ्रम

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका :ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी के. एल. राहुल सलामीला, तर डावखुरा देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असे संकेत भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने दिले आहेत. तसेच शुभमन गिलविषयी सामन्याच्या दिवशी सकाळीच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही मॉर्केलने सांगितले.

Swapnil S

पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी के. एल. राहुल सलामीला, तर डावखुरा देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असे संकेत भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने दिले आहेत. तसेच शुभमन गिलविषयी सामन्याच्या दिवशी सकाळीच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही मॉर्केलने सांगितले.

उभय संघांत येत्या शुक्रवारपासून बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीस पात्र ठरण्याकरता भारताला ही मालिका किमान ४-० अशा फरकाने जिंकणे गरजेचे आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी अनुपलब्ध असल्याचे समजते. तसेच सरावादरम्यान गिलच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तोसुद्धा पहिल्या कसोटीसाठी वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत राहुल व पडिक्कल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ४० वर्षीय मॉर्केलने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याविषयी माहिती दिली.

“पहिल्या कसोटीसाठी भारताची तयारी जोरात सुरू आहे. गिलच्या तंदुरुस्तीत सुधारणा होत असली, तरी त्याच्याविषयी अंतिम निर्णय शुक्रवारी सकाळी घेण्यात येील. रोहित व गिलच्या अनुपस्थितीत राहुल व पडिक्कल संघातील स्थानासाठी प्रबळ दावेदार आहेत,” असे मॉर्केल म्हणाला. ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध खेळताना राहुलला छाप पाडता आली नाही. मात्र यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी असून तो सलामीपासून ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोठेही फलंदाजी करू शकतो.

दुसरीकडे पडिक्कलने भारत-अ संघाकडून खेळताना पहिल्या सामन्यात २७६ चेंडूंत १२३ धावा केल्या. त्याने दोन्ही लढतींमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. भारतीय संघात विराट कोहली चौथ्या व ऋषभ पंत पाचव्या स्थानी खेळत असल्याने पडिक्कलला गिल उपलब्ध नसल्यास तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. मुंबईकर सर्फराझ खान मात्र शर्यतीत पिछाडीवर पडल्याचे दिसते. ध्रुव जुरेलने ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध दुसऱ्या लढतीत जिगरबाज खेळी साकारली. त्यामुळे सहाव्या स्थानासाठी सर्फराझच्या तुलनेत जुरेलचे पारडे जड आहे.

दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला नुकताच मायदेशातच कसोटी मालिका पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारताला ३-० अशी धूळ चारली. त्यामुळे १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावण्यासह २४ वर्षांनी व्हाइटवॉश पत्करण्याची नामुष्कीसुद्धा भारतावर ओढवली. आता भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका किमान ४-० अशा फरकाने जिंकल्यावर अन्य संघांच्या कामगिरीवरही विसंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे भारताची कसोटी लागणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा भारताचे नेतृत्व करणार आहे. एकूणच या मालिकेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

नितीशच्या कामगिरीकडे लक्ष : मॉर्केल

पहिल्यांदाच एखाद्या कसोटी मालिकेसाठी भारतीय चमूत स्थान मिळालेल्या नितीश रेड्डीच्या कामगिरीवर सर्वांनी लक्ष ठेवा, असे मत मॉर्केलने नोंदवले. आंध्र प्रदेशच्या २१ वर्षीय नितीशला ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध फारशी छाप पाडता आली नाही. मात्र सातव्या-आठव्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करण्यासह तो मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो. आयपीएल २०२४मध्ये चमक दाखवल्यावर त्याला टी-२० प्रकारात भारताकडून खेळण्याची संधी लाभली. आता कसोटीतही तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे निर्णायक ठरेल. भारतीय संघातील चौथा वेगवान गोलंदाज म्हणून एक बाजू सांभाळण्याची जबाबदारी नितीशवर असेल. त्याशिवाय मोहम्मद शमीवर संघ व्यवस्थापनाचे लक्ष असून त्याचा उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे, असेही मॉर्केलने सांगितले.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ