सरकारी नोकरीच्या मागे धावू नका! राष्ट्रकुलमधील पदकविजेत्यांना केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांचा मोलाचा सल्ला 
क्रीडा

सरकारी नोकरीच्या मागे धावू नका! राष्ट्रकुलमधील पदकविजेत्यांना केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांचा मोलाचा सल्ला

केवळ सरकारी नोकरी मिळवण्याच्या हेतूने राष्ट्रकुल पदक जिंकू नका, तर यापुढेही अशीच कामगिरी करत रहा. कारकीर्दीतून निवृत्त झाल्यावर स्वत:च्या अकादमी सुरू करा, असा मोलाचा सल्ला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकविजेत्यांना दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : केवळ सरकारी नोकरी मिळवण्याच्या हेतूने राष्ट्रकुल पदक जिंकू नका, तर यापुढेही अशीच कामगिरी करत रहा. कारकीर्दीतून निवृत्त झाल्यावर स्वत:च्या अकादमी सुरू करा, असा मोलाचा सल्ला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकविजेत्यांना दिला. सोमवारी वेटलिफ्टर्सची भेट घेतल्यावर मंगळवारी डॉ. मांडविया यांनी नवी दिल्ली येथे बॉक्सिंग, ज्युदो खेळातील पदकविजेत्यांसह पॅरा क्रीडापटूंची भेट घेत त्यांचा गौरव केला.

ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व उत्साहात पार पडले. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले होते, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताच्या पदकसंख्येवर परिणाम होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. १२२ खेळाडूंसह सहभागी झालेल्या भारताला वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारांतूनच सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. या क्रीडापटूंनी हा वि‌श्वास सार्थ ठरवून भारताला पदकतालिकेत चौथे स्थान मिळवून दिले. भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य, ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके पटकावली.

दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या बॉक्सिंग, ज्युदो आणि पॅरा-ॲथलेटिक्समधील पदकविजेत्या खेळाडूंचा मांडविया यांच्या हस्ते मंगळवारी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सुवर्णपदक विजेत्यांना ३० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना २० लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विजेत्यांचे अभिनंदन करताना मांडविया यांनी खेळाडूंना पुढील पिढीतील क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्याचे आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान कायम ठेवण्याचे आवाहन केले.

“राष्ट्रकुलमधील पदकावर तुम्ही समाधानी होऊ नका. तसेच फक्त या पदकाच्या बळावर सरकारी नोकरीचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवू नका. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतही अशीच कामगिरी करा. तसेच खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावरही कशाप्रकारे युवा पिढीला घडवता येईल, याचा विचार करा. रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांनी सुवर्णपदकासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तर सुवर्णपदक विजेत्यांनी आपले हेच यश टिकवून ठेवले पाहिजे,” असे स्पष्ट मत मांडविया यांनी मांडले. त्याशिवाय गुरूचे मार्गदर्शन आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते, त्यामुळे खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकांचे योगदान कधीही विसरू नये, अशी आठवणही मांडविया यांनी करून दिली.

या सत्कार समारंभात भारतीय बॉक्सिंग संघातील १० पदकविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचा समावेश होता. भारताने राष्ट्रकुलमध्ये जिंकलेल्या ३९ पदकांपैकी १० पदके बॉक्सिंगमधून आली. तसेच १३ सुवर्णपदकांपैकी सर्वाधिक ७ सुवर्ण बॉक्सिंग रिंगमधूनच आले. प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरिया, प्रिया घांघस, साक्षी चौधरी, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच, अंकुश पंघाल या सात जणांनी सुवर्णपंच लगावला. त्याशिवाय लव्हलिना बोर्गोहैन, नरेंद्र बेरवाल, जादुमणी सिंग यांनी रौप्यपदक जिंकले.

क्रीडा मंत्र्यांनी ज्युदो संघाचाही गौरव केला. भारताने ज्युदो प्रकारात दोन ऐतिहासिक सुवर्णपदकांसह एकूण चार पदके जिंकून आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी ज्युदोमध्ये भारतासाठी पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जपानमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मांडविया यांनी खेळाडूंना हीच लय कायम ठेवण्याचे सांगितले.

पदकविजेत्यांचे थाटात आगमन

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची मान अभिमानाने उंचावल्यावर सर्व खेळाडूंचे सोमवारी मध्यरात्री ते मंगळवार सायंकाळपर्यंत भारतात थाटात आगमन झाले. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर सुवर्णपदक विजेती ज्युदोपटू अस्मिता डे, हर्ष सिंग यांच्यासह बॉक्सिंगमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या साक्षी चौधरी, प्रीती पवार यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. ढोल-ताशाच्या गजरात, फुलांचा तसेच नोटांचा हार घालून खेळाडूंना खांद्यावर उचलून यावेळी त्यांचे स्वागत झाले. या सर्व पदकविजेत्यांना मंगळवारी नवी दिल्ली येथे क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे सर्व पदकविजेते थेट दिल्लीतच दाखल झाले.

सुवर्णपदक विजेत्यांना ३० लाख

क्रीडा मंत्र्यांनी सुवर्णपदक विजेत्यांना ३० लाख, रौप्यपदक विजेत्यांना २० लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना १० लाख रुपयांची रोख पारितोषिके प्रदान केली. तसेच प्रत्येक राज्यातील सरकारही लवकरच आपापल्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक जाहीर करेल, असे अपेक्षित आहे. पुढील काही दिवसांत हे पदकविजेते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील, असे समजते. राष्ट्रकुलमधील पदक विजेत्यांना आयोजकांतर्फे किंवा कॉमनवेल्थ महासंघातर्फे कोणतेही रोख पारितोषिक दिले जात नाही. त्यांना फक्त पदक दिले जाते. भारताच्या केंद्र शासनातर्फे राष्ट्रकुलमधील सुवर्ण पदकविजेत्यांना ३० लाख देण्याची परंपरा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पालिका रुग्णालयांतील नियमित OPD सेवा बंद; आजपासून रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता, निवासी डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा

साकीनाका मॅनहोल दुर्घटना प्रकरण : कंत्राटदाराचे घूमजाव; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९९ रुपयांत बसपास; सर्व देणी देईपर्यंत सुविधा लागू, ७ ऑगस्ट रोजी बेस्टच्या वर्धापनदिनी होणार वाटप

'गुंगी गुडिया'वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान; काँग्रेस कार्यालयात घुसून अजित पवार गटाची घोषणाबाजी

समाजकारण, राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला; डॉ. डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली