न्यूयॉर्क : पोलंडची अग्रमानांकित इगा स्विआटेक आणि रशियाचा पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांना गुरुवारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीचा अग्रमानांकित जॅनिक सिनर व अमेरिकेची सहावी मानांकित जेसिका पेगुला यांनी प्रथमच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला.
पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या सिनरने मेदवेदेवला ६-२, १-६, ६-१, ६-४ असे चार सेटमध्ये पराभूत केले. कार्लोस अल्कराझ, नोव्हाक जोकोव्हिच असे महत्त्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर गेल्याने सिनरला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या २३ वर्षीय सिनरसमोर ग्रेट ब्रिटनच्या २५व्या मानांकित जॅक ड्रेपरचे आव्हान असेल. ड्रेपरने अन्य उपांत्यपूर्व लढतीत ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरला ६-३, ७-५, ६-२ अशी धूळ चारली. त्यानेसुद्धा पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात १२वा मानांकित टेलर फ्रिट्झ आणि २०वा मानांकित फ्रान्सेस टियाफो हे अमेरिकेचे खेळाडू आमनेसामने येतील.
महिला एकेरीत पेगुलाने अग्रमानांकित स्विआटेकवर ६-४, ६-२ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. २०२२मध्ये अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या स्विआटेकला गेल्या दोन वर्षांत या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. पेगुलाने मात्र प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला असून तिच्यासमोर आता चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान असेल. मुचोव्हाने ब्राझीलच्या २२व्या मानांकित बीट्रीझ मादियाला ६-१, ६-४ अशी धूळ चारली. अन्य उपांत्य लढतीत दुसरी मानांकित आर्यना सबालेंका आणि १३वी मानांकित एमा नवारो एकमेकांविरुद्ध झुंजतील.
दरम्यान, भारताचा वरिष्ठ खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन सहकारी अल्दिला सुतियादी यांना बुधवारी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
लुइस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत टेलर टाऊनसेंड आणि डोनाल्ड यंग या अमेरिकेच्या बिगरमानांकित जोडीने बोपण्णा-सुतियादीच्या आठव्या मानांकित जोडीवर ६-३, ६-४ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. त्यामुळे ४४ वर्षीय बोपण्णाचे प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. २०१५मध्येही मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतच बोपण्णाला पराभव पत्करावा लागलेला. बोपण्णाने भारताकडून निवृत्ती पत्करलेली आहे.