गुजरातविरुद्ध मुंबईची कसोटी; अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज उभय संघांत निर्णायक लढत X
क्रीडा

IPL 2026: गुजरातविरुद्ध मुंबईची कसोटी; अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज उभय संघांत निर्णायक लढत

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम सध्या रंगतदार टप्प्यावर असून प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे चित्र बदलते आहे. सोमवारी चाहत्यांना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आणखी एक कडवी झुंज अपेक्षित आहे. लयीत असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध संघर्ष करत असलेल्या मुंबई इंडियन्सची कसोटी लागणार आहे.

Swapnil S

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम सध्या रंगतदार टप्प्यावर असून प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे चित्र बदलते आहे. सोमवारी चाहत्यांना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आणखी एक कडवी झुंज अपेक्षित आहे. लयीत असलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध संघर्ष करत असलेल्या मुंबई इंडियन्सची कसोटी लागणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.

दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने पाचपैकी ३ सामने जिंकले आहेत. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यावर या संघाने लय मिळवून सलग तीन लढती जिंकल्या. गिलने स्वत: सलग तीन अर्धशतके झळकावून अन्य संघांना इशारा दिला आहे. तसेच साई सुदर्शन, जोस बटलरही लयीत आहेत. वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया यांच्याकडून गुजरातला अपेक्षा असेल. गोलंदाजीत कगिसो रबाडा व रशिद खान या अनुभवी गोलंदाजांना सूर गवसल्यामुळे गुजरात आणखी घातक ठरत आहे. मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णादेखील टिच्चून मारा करत असल्याने गुजरातला रोखणे मुंबईसाठी कठीण जाऊ शकते.

दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला पाचपैकी फक्त एकच लढत जिंकता आली असून सलग चार लढतींमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. कागदावर बलवान संघ असला, तरी मुंबईचा संघ मैदानात ढेपाळत आहे. तसेच रोहित शर्मा व मिचेल सँटनर यांच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम असल्याने मुंबईची चिंता बळावली आहे. रोहित रविवारी सराव करताना आढळला. क्विंटन डीकॉक व नमन धीर यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. डीकॉकने पंजाबविरुद्ध शतकी पुनरागमन केले. त्यामुळे रायन रिकल्टनला डच्चू मिळू शकते. मात्र सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांनी सपशेल निराशा केली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा अद्याप हंगामातील पहिल्या बळीच्या शोधात आहे. ट्रेंट बोल्ट संघात परतणे अपेक्षित आहे. सांघिक कामगिरीवर लक्ष देत प्रत्येक खेळाडूने आपले सर्वस्व योगदान दिले, तर मुंबईचा संघ नक्कीच गुजरातला नमवू शकतो. विल जॅक्स मात्र अद्यापही मुंबईच्या ताफ्यात दाखल झालेला नाही.

एकूणच मुंबईवर दडपण वाढत आहे. कारण पाच वेळच्या विजेत्या या संघाने यंदा १३ वर्षांनी पहिली लढत जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर मात्र दिल्ली, राजस्थान, बंगळुरू व पंजाब या संघांविरुद्ध मुंबईला पराभव पत्करावा लागला. गतवर्षीदेखील मुंबईने सुरुवातीच्या पाचपैकी एकच लढत जिंकून अखेरीस बाद फेरी गाठली होती. यंदा मुंबई पुन्हा तसे करू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

उभय संघांत आतापर्यंत ८ सामने झाले आहेत. त्यांपैकी गुजरातने ५, तर मुंबईने ३ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी गुजरातच्या बाजूने असून मुंबईने आजवर अहमदाबाद येथे एकही लढत जिंकलेली नाही. त्यामुळे ते गुजरातला झुंज देणार, याकडे लक्ष असेल.

खेळपट्टीचा अंदाज

अहमदाबाद येथे धावांचा पाठलाग करणे सोपे मानले जात. तसेच येथे दवही मोठ्या प्रमाणात येते. खेळपट्टी क्रमांक पाचवर सोमवारची लढत होणार असून येथे गेल्या सातपैकी चार लढतींमध्ये मात्र प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक असेल.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.

तिसऱ्या मुंबईसाठी MMRDA ने संपादित केली २१६ एकर जमीन; रायगड-पेण ग्रोथ सेंटरला वेग; भूसंपादन धोरणाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण : SIT समोर पहिल्या मुलीने नोंदवला जबाब

विरार-अलिबाग मार्गावर होणार ४० वर्षे टोलवसुली; हलक्या वाहनांना ७६५ रुपये टोल; प्रकल्पासाठी प्रति किलोमीटर ३ हजार कोटी खर्च

अदानी समूहाच्या तीन नवीन कंपन्यांची स्थापना; नवी मुंबई विमानतळ परिसरात हॉटेल, इमारतींचा विस्तार

भारत-अमेरिका व्यापार करारावर आजपासून तीन दिवस चर्चा