नागोया : भारताची तारांकित वेटलिफ्टर मीराबाई चानूने अखेर कारकीर्दीत प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने रौप्यपदक पटकावले. आशियाई स्पर्धेत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तब्बल २८ वर्षांनी पदक मिळवले, हे विशेष. १९९८ मध्ये कर्णम मल्लेश्वरीने भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये अखेरचे आशियाई पदक कमावले होते.
टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या ३२ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ६८ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात १११ किलो असे एकूण १९८ किलो वजन उचलून हे ऐतिहासिक यश साध्य केले. उत्तर कोरियाच्या री साँगमने २१५ किलो (९४+१२१ किलो) वजन उचलून जागतिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर इंडोनेशियाच्या लुलुक डायना ट्राय विजयानाने १९१ किलो वजनासह कांस्यपदक मिळवले.
दरम्यान, जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबरपासून २०वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाली आहे. भारताने बुधवारी दिवसभरात १ रौप्य व ४ कांस्य अशी पाच पदकांची कमाई केली. भारत सध्या पदकतालिकेत १ सुवर्ण, ५ रौप्य, ६ कांस्य अशा एकूण १२ पदकांसह १३व्या क्रमांकावर आहे. चीन ४८ सुवर्णपदकांसह अग्रस्थानी आहे.
तत्पूर्वी, मीराबाईला २०१४ व २०२३च्या आशियाई स्पर्धेत पदक जिंकता आले नव्हते. २०१४मध्ये ती चक्क नवव्या स्थानी होती, तर २०२३मध्ये तिला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. २०१८मध्ये तिला दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. अखेर १२ वर्षांच्या संघर्षानंतर यंदा मीराबाईने पहिले आशियाई पदक प्राप्त केले. “आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणे हे माझे स्वप्न होते. २०१४च्या स्पर्धेपासून मी या पदकाचा पाठलाग करत होते. या पदकाने माझे आयुष्य पूर्ण झाले असून आता जणू खांद्यावरील ओझे हलके झाल्याचे भासत आहे,” असे मीराबाई म्हणाली.
मीराबाईने स्नॅच प्रकारात ८३, ८५ आणि ८७ किलो वजन सहज उचलले. त्यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात पहिल्या प्रयत्नात १०७ किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात १११ किलो वजन उचलून रौप्यपदक निश्चित केले.
पंतप्रधान मोदींकडून मीराबाईचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाईच्या या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आणि म्हटले की, तिचा दृढनिश्चय आणि सातत्य देशाला प्रेरणा देत राहील. “मीराबाईसाठी एक विशेष रौप्य पदक. महिलांच्या ४९ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचा दृढनिश्चय आणि सातत्य देशाला प्रेरणा देत राहील. भारताला तिचा अभिमान आहे. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा,” असे ट्वीट त्यांनी केले.
ज्ञानेश्वरी आठव्या स्थानावर
राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक विजेती ठरलेल्या ज्ञानेश्वरी यादवला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात निराशाजनक आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. २३ वर्षीय ज्ञानेश्वरीने स्नॅच प्रकारात ८७ किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात १०८ किलो वजन उचलले. तिची एकूण कामगिरी १९५ किलोची होती. जुलैमध्ये ग्लासगो येथील राष्ट्रकुलमध्ये रौप्य पदक मिळवून देणाऱ्या तिच्या १९९ किलोच्या कामगिरीपेक्षा ही कामगिरी चार किलोने कमी होती.
मीराबाईची कमाई
ऑलिम्पिक : रौप्यपदक (२०२०)
राष्ट्रकुल : सुवर्णपदक (२०१८, २०२२, २०२६), रौप्यपदक (२०१४)
आशियाई : रौप्यपदक (२०२६)
जागतिक : सुवर्णपदक (२०१७), रौप्यपदक (२०२२, २०२५)
भारताने तब्बल २८ वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पदक पटकावले. १९९८मध्ये बँकॉक (थायलंड) येथील आशियाई स्पर्धेत ६३ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता २८ वर्षांनी मीराबाईने हा पराक्रम केला.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)